मधुमेहाच्या दुष्परिणामाची वाट पाहू नका : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 08:22 PM2018-11-20T20:22:24+5:302018-11-20T20:23:25+5:30
आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा निरोगी जीवनशैली आत्मसात करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा निरोगी जीवनशैली आत्मसात करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.
गिल्लूरकर डायबिटीज केअर, ज्येष्ठ नागरिक मंडळ विदर्भ तसेच सरस्वती पॅथॉलॉजी लेबोरेटरी व रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘निरोगी जीवनशैली व मधुमेहावर विजय’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मधुमेहतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या ‘डायबेटीज पर विजय’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यशाळेच्या उद््घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, मनपाचे सत्तापक्षनेता संदीप जोशी, डॉ. सुनील कांबळे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, चरणसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी उपस्थितांना मधुमेहाशी लढण्याचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, योग्य आहार, नियमित व्यायाम व औषधोपचार या शिस्तीमुळे मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येतो. गरज आहे केवळ मधुमेहाशी मैत्री करण्याची. प्रत्येक क्षण आनंदाने जागण्याची, असा सल्ला डॉ. गिल्लूरकर यांनी दिला.
कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. किर्तीलता गिल्लूरकर, डॉ. विनोद जयस्वाल, दर्शनी जयस्वाल, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, सचिव अॅड. अविनाश तेलंग, डॉ. मंजूषा सावरकर, डॉ. बी.आर. आकरे, डॉ. महेंद्र सावरकर, रामरक्षा शाहू, डॉ. एस.एम. जयस्वाल आदींचा सहभाग होता.