‘पब्लिसिटी’साठी काम करू नका; पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:20 AM2018-08-09T10:20:24+5:302018-08-09T10:20:58+5:30
पोलिसांचे काम हे प्रामाणिक आणि नि:स्वार्थपणे नागरिकांची सेवा करणे होय. लोकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास निर्माण करणे आहे. गुन्हेगारांना उघडे पाडून समाजाला भयमुक्त करणे आहे, असे म्हणणे आहे, नवे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे.
जगदीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस पब्लिसिटीसाठी काम करण्याऐवजी आता आपल्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करेल. पोलिसांना त्यांच्या कामाने प्रसिद्धी मिळायला हवी. पोलिसांचे काम हे प्रामाणिक आणि नि:स्वार्थपणे नागरिकांची सेवा करणे होय. लोकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास निर्माण करणे आहे. गुन्हेगारांना उघडे पाडून समाजाला भयमुक्त करणे आहे, असे म्हणणे आहे, नवे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे.
डॉ. उपाध्याय यांनी बुधवारी ‘लोकमत’शी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर विशेष चर्चा केली. या वेळी डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, कु ठलाही व्यक्ती किंवा संस्थेची प्रतिमा ही त्याच्या कामाने तयार होते. पोलीसही एक प्रमुख संस्था आहे. प्रत्येक नागरिकांची कुठल्या ना कुठल्या रूपात पोलिसांशी संबंध येतोच. त्या वेळी त्याला जसा अनुभव येतो, त्याच्याशी जसे वर्तन केले जाते, त्यावरून त्याच्या मनात त्याची प्रतिमा कायमस्वरूपी तयार होते. यासाठी पोलिसांनी नागरिकांशी व्यवहार करताना संयम आणि सहकार्याची भूमिका स्वीकारावी.
काही दिवसांपासून शहर पोलीस आकड्यांच्या भरवशावर चालत आहे. आकडे सांगून गुन्हेगारी कशी कमी झाली आहे आणि पोलिसांना हायटेक बनवण्यात आल्याचे दावे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नियमांना डावलून बांधकामे करण्यात आली. या बांधकामांचा वापर केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी करण्यात आला. बजाजनगर पोलीस ठाणे आणि सिव्हिल लाईन्स येथील डीजी निवास याचे पुरावे आहेत. बजाजनगर पोलीस ठाण्याचे बांधकाम नकाशा मंजूर न करताच करण्यात आले आहे. तर रामगिरी मार्गावरील डीजी निवासही नियमांना डावलून करण्यात आले आहे. यासंबंधात प्रश्न विचारला असता डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांचे पब्लिसिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांच्या नेतृत्वात पोलीस पब्लिसिटीसाठी काम करण्याऐवजी आपल्या कामातूनच प्रसिद्धी मिळवेल. प्रतिबंधित कारवाईनंतरही गुन्हेगार सक्रिय होत असल्याबद्दल विचारले असता पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, शहरातील गुन्हेगारांची लिस्ट तयार केली जात आहे. त्यांच्यावर पोलीस स्टेशनशिवाय गुन्हे शाखाही नजर ठेवेल. गुन्हेगार सक्रिय होताच त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. गँग बनवून गुन्हे करणाऱ्यांचा सफाया केला जाईल. यासाठी ‘फूल प्रूफ सिस्टम’ लागू करण्यात येईल. सभ्य समाजात गुन्हेगारांसाठी कुठलीही जागा नाही. तुरुंगात कुख्यात कैद्यांना त्यांनी शांत होताना पाहिले आहे. शहरातील गँगस्टरला त्याची जागा दाखवण्यास जास्त वेळ लागणार नाही. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, पोलीस कल्याणालाही प्राथमिकता दिली जाईल. पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर ते नागरिकांची सेवाही चांगल्या पद्धतीने करू शकतील. नागरिकांना पोलिसांशी जोडण्यासाठी ‘मोहल्ला कमिटी’ला अधिक प्रभावी बनवण्यात येईल. शांती कमिटीच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांची मदत घेतली जाईल. मिशन मृत्यूंजयच्या माध्यमातून युवकांना जागृत केले जाईल.
‘लॅण्ड माफिया’विरुद्ध कठोर पावले उचलणार
पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, लॅण्ड माफिया आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. पोलिसांच्या कठोर कारवाईनंतरही लॅण्ड माफिया सक्रिय आहे. लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा लोकांना आता शहरात कुठलाही थारा मिळणार नाही. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला अधिक प्रभावी केले जाईल, असेही त्यांनी
स्पष्ट केले.