जात पडताळणीसाठी असा करा अर्ज
By Admin | Published: August 4, 2014 12:57 AM2014-08-04T00:57:15+5:302014-08-04T00:57:15+5:30
२०१४-१५ च्या शैक्षणिक सत्रात १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ३०आॅक्टोबर २०१४ पूर्वी जात प्रमाणपत्र
नागपूर : २०१४-१५ च्या शैक्षणिक सत्रात १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ३०आॅक्टोबर २०१४ पूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.३ चे उपायुक्त सुर्रेद्र पवार यांनी केले आहे.अर्जधारकांनी आॅनलाईन अर्ज भरून आवश्यक पुराव्यासह परिपूर्ण भरलेले व प्राचार्याची सही असलेले अर्ज महाविद्यालयाच्या पत्रासह प्रस्ताव समिती कार्यालयात सादर करावे. विलंबाने प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. फक्त नागपूर जिल्ह्यातून निर्गमित असलेले जातीचे प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे.
अनुसूचित जमातीसाठी १९६१ पूर्वीचे व इतर मागासवर्गाकरिता १९६७ पूर्वीचे जातीचे तसेच महराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थी इतरत्र शिकत असले तरी त्यांनी त्यांचे प्रस्ताव मुदतीत सादर करावे. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची माहिती पवार यांनी दिली.बीई व्दितीय वर्षाला प्रवेश घेतेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ज्यांनी गुणवत्तेनुसार प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशानंतर एक महिन्याच्या आत सीएपीएसच्या पत्रासह अर्ज सादर करावे. तसेच एमबीए व एमसीए मध्ये सीएपीएस अंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर एक महिन्यात अर्ज सादर करावे. बीई प्रथम वर्ष,एमबीबीएस प्रथम वर्ष, बीएएमएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव मुदत १५ जुलै होती. आता त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
यापुढे समिती कार्यालयात अर्ज आॅनलाईन स्वीकारले जातील. अर्जदारांनी आॅनलाईन अर्ज करून त्याची प्रत काढून आवश्यक कागदपत्रासह विभागीय जात पडताळणी समितीच्या सिव्हिल लाईन कार्यालयात सादर करावयाचे आहे. (प्रतिनिधी)