करू क्या डायल नंबर, पोलीस म्हणतात डायल-१००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 10:56 AM2019-11-08T10:56:20+5:302019-11-08T10:58:12+5:30
आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला नागपूर पोलिसांनी दिलेल्या सणसणीत उत्तरामुळे रणवीर आज दिवसभर नेटकऱ्यांच्या उपहासाचा विषय ठरला.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज यूअर स्माईल नंबर... व्हॉट इज यूअर स्टाईल नंबर, करु क्या डायल नंबर, असा प्रश्न करून रेट्रो लूकमध्ये स्वत:चा फोटो व्टीट करणाऱ्या आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला नागपूर पोलिसांनी दिलेल्या सणसणीत उत्तरामुळे रणवीर आज दिवसभर नेटकऱ्यांच्या उपहासाचा विषय ठरला. सोबतच या उत्तरामुळे नागपूर पोलीस पुन्हा देशविदेशातील नेटकऱ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले.
बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिंबासारखे सुपरडुपर हिट चित्रपट देतानाच चित्रविचित्र स्टाईलच्या फोटोमुळे रणवीर सिंग सध्या तरुणाईची धडकन बनला आहे. रणवीर कधी स्वत:चे हॉट फोटो पोस्ट करतो तर कधी दीपिकाच्या फोटोवर कमेंट करत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह राहतो. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर नजर रोखून असतात.
वोगच्या फोटोशूटमधील लॅण्डलाईन फोनवर बोलतानाच्या पोजमधील फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ८० च्या दशकातील हिरोसारखा फिट्ट शर्ट आणि बेलबॉटम पॅन्ट घातलेल्या दिसणाऱ्या फोटोला रणवीरने गोविंदा-करिश्मा कपूरच्या गाण्याच कॅप्शन दिल आहे. गोविंदा-करिश्मावर चित्रित ‘‘व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज यूअर स्माईल नंबर... व्हॉट इज यूअर स्टाईल नंबर, करु क्या डायल नंबर’’,अस हे गाणं होत. या गाण्याने ९० च्या दशकात कमालीची लोकप्रियता मिळवली होती. ती ध्यानात ठेवून की काय, रणवीरने आपल्या फोटोखाली ‘‘व्हॉट इज मोबाईल नंबर... करु क्या डायल नंबर...’’ असा प्रश्न विचारला असावा. त्याच्या या प्रश्नवजा कॅप्शनला अर्थातच हजारपेक्षा जास्त मजेदार उत्तर ( कमेंट) दिले आहेत. नागपूर पोलिसांनी मात्र रणवीरचे व्टिट रिव्टिट करून त्याला डायल १०० असा पर्यायवजा उत्तर दिले आहे. अर्थात् नागपूर पोलिसांनी त्याला तू पोलिसांना १०० नंबरवर डायल कर, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, अस सुचवल आहे. देशविदेशातील ५ हजारांवर नेटकऱ्यांनी नागपूर पोलिसांचे हे रिव्टिट व्हायरल केल आहे. त्यामुळे रणवीरचे व्टिट आणि नागपूर पोलिसांचे हे रिव्टिट घेऊन नेटकरी रणवीरला दिवसभर ट्रोल करीत होते.
नागपूर पोलिसांच्या व्टिटर अकाऊंटवरून हँडल करण्यात आलेले हे रिव्टिट कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. त्याला बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६७५४ नेटकऱ्यांनी रिव्टिट केले होते तर, तब्बल २९,२०० लाईक मिळाले होते. नेटकऱ्यांच्या या प्रतिसादामुळे नागपूर पोलिसांचे व्टिटर अकाऊंट दुसऱ्यांदा जगभरातील नेटकऱ्यांत चर्चेला आले आहे. यापूर्वी चंद्रयान -२ मोहिमेतील विक्रम लँडरने आपली कार्यकक्षा सोडली अन् प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यावेळी त्याने प्रतिसाद द्यावा म्हणून देशभरात वेगवेगळे प्रयोग झाले होते. नागपूर पोलिसांनी मात्र विक्रम लँडरला ‘ चिंता करू नको... कार्यकक्षा (सिग्नल) तोडले तर तोडले... तू प्रतिसाद दे... तुझे चालान फाडणार नाही!’ असे व्टिट करून जगभरातील नेटकऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.