शहराचा नावलौकिक होईल असे कार्य करा : महापौर नंदा जिचकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:30 PM2019-06-12T23:30:37+5:302019-06-12T23:32:32+5:30
शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे, यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी मनपा सेवेत रुजू होणाऱ्या ऐवजदार सफाई कामगारांना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या स्वच्छतेमध्ये सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. शहर स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेने मिळविलेले यश हे सफाई कामगारांच्या कार्याची फलश्रुती आहे. प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या शहराचा नावलौकिक करणाऱ्या आईवडिलांच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून आपले शहर स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक एक वर यावे, यासाठी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे कार्य करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी मनपा सेवेत रुजू होणाऱ्या ऐवजदार सफाई कामगारांना केले.
मनपा सेवेतील मृत ऐवजदार सफाई कमागारांच्या वारसदारांना बुधवारी महापालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या हस्ते ऐवजी कार्ड प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य समिती सभापती मनोज चापले, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, राजेश हाथीबेड, एसबीएम विकास संस्थेचे अध्यक्ष सतीश सिरसवान व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षांच्या प्रयत्नाला यश
ऐवजदार सफाई कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची होणारी अवस्था लक्षात घेता त्यांच्या वारसदाराला ऐवजदार सफाई कर्मचारी म्हणून रुजू करावे यासाठी अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी दखल घेतली. प्रशासनातर्फे ही आयुक्तांनी योग्य निर्णय घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेले व अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे, असे सांगत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह आयुक्तांचेही अभिनंदन केले. ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्यात यावे यासाठी सत्तापक्षातर्फे सभागृहामध्ये भूमिका मांडण्यात आली. येणाऱ्याअडचणी सोडवून प्रशासनाने अखेर सेवेत नियुक्तीचा मार्ग मोकळा केला. शहरात स्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता सर्वांनी ठरवून दिलेल्या वेळेवर १०० टक्के काम करून कोणत्याही तक्रारीची संधी देऊ नका,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.