‘काळे’ पाणी प्यायचे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:33 AM2017-11-02T01:33:38+5:302017-11-02T01:33:49+5:30
औद्योगिकीकरणामुळे बुटीबोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पाणीपुरवठा केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुटीबोरी : औद्योगिकीकरणामुळे बुटीबोरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण गावाला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून वॉर्ड क्रमांक-१ आणि २ मधील नागरिकांच्या घरी असलेल्या नळांना काळेकुट्ट पाणी येत असल्याने तसेच सदर पाणी पिण्यासाठी तर सोडाच कोणत्याही कामासाठी वापरण्यायोग्य नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे ‘काळे पाणी प्यायचे का’, असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बुटीबोरी येथीन वॉर्ड क्रमांक-१ व २ मधील घरांमध्ये असलेल्या नळांना मागील काही दिवसांपासून काळ्या रंगाचे पाणी येत आहे. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नळाला रोजच काळे पाणी येत असल्याने तसेच पिण्यासह वापरण्यासाठी लागणारे पाणी आणायला भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी याबाबत त्यांच्या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्यांना कळविले तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, प्रशासनाने यावर कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
ही समस्या सोडविण्यासाठी बुटीबोरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसूफ शेख यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकाºयाला मागण्यांचे निवेदन देऊन ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. जोशी यांच्याशी या समस्येवर चर्चा केली आणि ती सोडविण्याची मागणी केली.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना पाठविण्यात आल्याचे युसूफ शेख यांनी सांगितले. बुटीबोरी येथे डेंग्यू, टायफाईड, मलेरिया तसेच स्वाईन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नळाच्या काळ्या पाण्याने भर टाकली आहे. या पाण्याचा वापर कपडे किंवा भांडी धुण्यासाठी करणे शक्य नाही. मग ते पिण्यासाठी कसे वापरायचे, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला.
या सर्व समस्यांकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप काही नागरिकांनी केला असून, नळाला येणाºया काळ्या पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिष्टमंडळात युसूफ शेख, राजू गावंडे, राहुल पटले, रोहित कुकडे आदीेंचा समावेश होता.
या आहेत मागण्या
सर्व हॅण्डपंपजवळील परिसराची साफसफाई करून पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावे, सार्वजनिक विहिरींची व विहिरींच्या परिसराची साफसफाई करून विहिरींमधील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावे, प्रत्येक वॉर्डात डासांची पैदास वाढल्याने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी अथवा धुरळणी करावी, नळाला येणाºया दूषित पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, गावातील नाल्यांची साफसफाई करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, जुन्या वस्तीतील गोदामाजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावून त्या परिसराची साफसफाई करावी, जुन्या वस्तीतील काही रस्त्यांलगत कचरा साचला असून, त्याची विल्हेवाट लावावी, रोडवरील खड्डे बुजवावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.