चायनिज खाताय? जरा जपून! अतिसेवन ठरू ठकते घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 02:10 PM2021-09-23T14:10:15+5:302021-09-23T14:11:28+5:30
चायनिज पदार्थ हे फास्ट फूडच्या प्रकारात माेडतात. हे पदार्थ टेस्टी करण्यासाठी अजिनाेमाेटाेचा वापर प्रमाणाबाहेर केला जाताे. यामुळे शरीरात एडिबल टीशूज जमा हाेतात व लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात.
नागपूर : काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याची चिन्ह असताना लाॅकडाऊनचा विळखाही शिथिल हाेत चाालला असून जनजीवनही पूर्ववत हाेत चालले आहे. या गाेष्टी सुरळीत हाेताच पूर्वीप्रमाणेच लाेकांमध्ये फास्टफूडचा ट्रेंडही वाढत चालला आहे. फास्टफूडच्या ट्रेंडमध्ये चायनीज पदार्थांची आवड लाेकांना असते. मात्र हे चायनिज पदार्थ अनेक आजारांनाही निमंत्रण देत आहेत. अनेकदा हे पदार्थ शिळ्या अन्नापासून बनलेले असतात. शिवाय त्यांची टेस्ट वाढावी म्हणून त्यात ‘अजिनाेमाेटाे’सारखे रसायन टाकले जाते. यामुळे पाेटाचे आजार हाेतात व यांसह अनेक धाेकादायक आजारांचाही विळखा पडू शकताे. त्यामुळे आहारात चायनिज पदार्थ टाळण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जाताे.
काय आहे अजिनाेमाेटाे?
अजिनाेमाेटाे म्हणजे ‘माेनाेसाेडियम ग्लुटामिट’ हा पदार्थ साेडियम आणि ग्लुटामिट अॅसिडपासून बनलेला आहे. जपानी कंपनीने अजिनाेमाेटाे असे नामकरण केले, जे लाेकप्रियही झाले. त्यामुळे कंपनीने ते ट्रेडमार्क केले. ऊस, बिट, साेडियम, कॅसावा किंवा काॅर्नपासून ताे तयार केला जाताे. अन्नपदार्थांना चवदार बनविण्यासाठी ताे वापरला जाताे व विशेषत: नूडल्स, फ्राईड राईस, सुप आदी चायनिय पदार्थांमध्ये वापरला जाताे. थाेड्या प्रमाणात त्याचा वापर धाेकादायक नाही पण अधिक प्रमाण आराेग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
...म्हणून चायनिज खाणे टाळा
चायनिज पदार्थ हे फास्ट फूडच्या प्रकारात माेडतात. हे पदार्थ टेस्टी करण्यासाठी अजिनाेमाेटाेचा वापर प्रमाणाबाहेर केला जाताे. यामुळे शरीरात एडिबल टीशूज जमा हाेतात व लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. ऊर्जा अधिक लागते व स्थूलपणा वाढताे. वजन वाढणे, मधुमेह आणि रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतात. तातडीने हाेणाऱ्या परिणामांमध्ये अॅसिडीटी वाढणे, जेवणाची क्षमता कमी हाेणे आणि पाेटदुखीसारखे आजार हाेतात. त्यामुळे ते कमी करणे आवश्यक आहे.
आठ-पंधरा दिवसातून एखादे वेळी चायनिज पदार्थ खाल्ले तर ठीक आहे पण वारंवार आहारात चायनिजचा वापर हानीकारक ठरणारा आहे. लाेकांनी वारंवार खाणे टाळावे व विशेषत: लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे. यापासून पाेटाचे विकार हाेतात व दीर्घ काळानंतर लठ्ठपणा व हृदयविकारासारखे आजार हाेण्याचा धाेका असताे. त्यामुळे नागरिकांनी शक्यताे चायनिज खाणे टाळावे.
- डाॅ. अविनाश गावंडे