मनस्ताप का देता?
By admin | Published: February 8, 2016 03:05 AM2016-02-08T03:05:15+5:302016-02-08T03:05:15+5:30
ग्राहक जर विश्वासाने एखादी सुविधा घेत असेल तर त्यात काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण आणि भरपाई करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्था वा कंपनीची आहे,
जिल्हा ग्राहक मंचचा दणका स्टार हेल्थचे कान टोचले फ्युचर विस्टाला धडा दिला
जितेंद्र ढवळे नागपूर
ग्राहक जर विश्वासाने एखादी सुविधा घेत असेल तर त्यात काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण आणि भरपाई करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्था वा कंपनीची आहे, असे असतानाही उपराजधानीतील काही संस्था ग्राहकांचे समाधान करण्याऐवजी मनस्ताप देत असल्याचे चित्र आहे.अशा दोन संस्थांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दणका देत तक्रारकर्त्यांना नऊ टक्के व्याजासह नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत.
आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आधार
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या गांधी ले-आऊट जाफरनगर येथील शहीद सरवर यांनी स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इंशुरन्स कंपनीचा मेडीक्लॉसिक ग्रुप इन्शुरन्सचा विमा काढला होता. मात्र आजारासाठी विम्याचा क्लेम देण्यास कंपनीकडून नकार देण्यात आल्याने सरवर यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १२ अन्वये जिल्हा ग्राहक तक्रार निवार मंच, नागपूर यांच्याकडे तक्रार केली. तक्रारकर्ते सरवर यांच्यानुसार त्यांनी संबंधित विमा कंपनीकडून एक लाख रुपयांचा मेडीक्लॉसिक ग्रुप इन्शुरन्सचा विमा काढला होता. ४ फेब्रुवारी २०१३ रोजी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना क्रिसेंट अॅण्ड हेल्थ सेंटर येथे भरती करण्यात आले. तेथे त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली. यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सुटी देण्यात आली. सरवर यांनी २२ फेब्रुवारी २०१३ रोजी उपचाराची सर्व कागदपत्रे देयकांसह स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इंशुरन्स कंपनीकडे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सादर केली. संबंधित कंपनीने १० मे २०१३ रोजी पत्र पाठवत सरवर यांचा दावा फेटाळून लावला. यात त्यांना विमा कंपनीच्या विविध नियमांचा आधार दिला होता. यावर १९ नोव्हेंबर २०१३ रोजी सरवर यांनी स्टार हेल्थ अॅण्ड इंशुरन्स कंपनीला कायदेशीर विमा रकमेची मागणी केली होती. परंतु त्यांनी ती दिली नाही. याचिकाकर्ते सरवर यांची बाजू ऐकून घेत विमा कंपनीने मंचाकडे सादर केलेला लेखी जबाब विचारात घेत सरवर यांना एकूणच या प्रकरणात शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचा निर्वाळा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूरचे अध्यक्ष मनोहर चिलबुले, मंजुश्री खनके (सदस्य) आणि प्रदीप पाटील यांच्या समितीने दिला.
याप्रकरणात दोषी असलेल्या स्टार हेल्थ अॅण्ड इंशुरन्स कंपनीला मंचाने सरवर यांना विमा पॉलिसीप्रमाणे देय असलेली उपचार खर्चाची एक लाख रुपयांची रक्कम विमा दावा नाकारल्याच्या दिनांकापासून १० मे २०१३ पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत नऊ टक्के व्याजासह अदा करावी. याशिवाय तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत पाच हजार आणि तक्रार खर्चाबाबत पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.