सि लिं ड र वजन करून घेता का?
By admin | Published: February 1, 2016 02:44 AM2016-02-01T02:44:12+5:302016-02-01T02:44:12+5:30
सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्याकडून सिलिंडरचे वजन करून घेणे हा ग्राहकांचा हक्क आहे.
अनेकांचे काटे नादुरुस्त : एजन्सीवर कारवाईचा दणका, सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्याकडे काटा आवश्यक
नागपूर : सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्याकडून सिलिंडरचे वजन करून घेणे हा ग्राहकांचा हक्क आहे. परंतु त्यासंदर्भात अन्न पुरवठा विभागाकडून जनजागृती होत नसल्याने, ग्राहकही त्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉयसुद्धा आपल्या गाडीत काटा ठेवत नाही. गॅस वितरक एजन्सीने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वजनमापे विभागाने मोहीम राबवून गॅस एजन्सीवर धडक कारवाई केली. यात एजन्सीजवळ काटेच नसल्याचे आढळले. काहींजवळ असलेले काटे नादुरुस्त असल्याचेही निदर्शनास आले.
वजनमापे विभागाने नागपूर व वर्धा जिल्ह्यात २७ जानेवारीपासून कारवाईला सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यात ६८ गॅस एजन्सी आहे.
ग्राहक हक्क कायद्यान्वये घरपोच सिलिंडर देताना सिलिंडरचे वजन करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक डिलिव्हरी बॉय सोबत एजन्सीला एक काटा देणे आवश्यक आहे. नियमानुसार एजन्सीमध्ये जेवढी वाहने असतील, तेवढे काटे एजन्सीकडे असणे गरजेचे आहे. दरवर्षी वजन काट्यांचे नुतनीकरण करवून घेणेही अपेक्षित आहे.
ग्राहक आळशी झाला का ?
नागपूर : ग्राहकाकडून सिलिंडरचे वजन करून घेण्याचा आग्रहच होत नसल्याने, वितरकांनी काटे ठेवण्याकडे दुर्लक्ष केले. याचा फायदा डिलिव्हरी करणाऱ्यांनी उचलला. सिलिंडरमधून गॅस काढण्याचे प्रकार सुरू झाले. काही वर्षापूर्वी अन्न पुरवठा विभागाने अशा कारवायाही केल्या होत्या. त्यामुळे काही काळ हा प्रकार थांबला होता. छुप्या पद्धतीने हा प्रकार आजही सुरू असण्याची शक्यता आहे. ग्राहकांना सिलिंडर वेळेवर मिळाले एवढेच अप्रूप असल्याने, तेही वजनाच्या भानगडीत पडत नाही. आतापर्यंत झालेल्या कारवाईत ४ गॅस एजन्सीकडे काटेच नसल्याचे आढळले. ९ एजन्सीकडे असलेल्या काट्यांचे नुतनीकरण झाले नव्हते. १५ एजन्सीने वजनकाट्याच्या बाबतीत दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांने विभागाने चालान केले आहे. २ हजार ते १० हजारापर्यंत दंडाची वसुली त्यांच्याकडून करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. घरगुती सिलेंडरमध्ये १४.२ किलो गॅस असतो तर रिकाम्या सिलिंडरचे वजन १५ ते १६ किलोच्या दरम्यान असते. रिकाम्या सिलिंडरचे वजन सिलेंडरवर नमुद केलेले असते. त्यामुळे भरलेल्या सिलिंडरचे २९ किलोच्यावर असल्याची काळजी ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे.