पत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:53 AM2019-06-24T11:53:02+5:302019-06-24T11:55:06+5:30

पत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून होणारा छळ असह्य झाल्याने एका तरुण डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली

Doctor committed suicide in Nagpur due to harassment by wife and mother-in-law | पत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या

पत्नी व सासूच्या छळापायी नागपुरात डॉक्टरची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे मृत्यूपूर्वी बनविली व्हिडीओ क्लीपएमआयडीसीत गुन्हा दाखल

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून होणारा छळ असह्य झाल्याने एका तरुण डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने त्याला होत असलेल्या मानसिक त्रासाची व्यथा सांगणारी एक व्हिडीओ क्लीप तयार केली. ती आपल्या मोबाईलमध्ये साठवली अन् मृत्यूला कवटाळले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन हेलावून टाकणारी ही घटना दोन महिन्यानंतर उजेडात आली.
डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (वय ३२) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. सागरच्या मृत्यूला त्याची पत्नी डॉ. कोमल, तिची आई मनीषा मुकुंदराव तोडकर आणि कोमलचा भाऊ आशिष तोडकर (वय ३३, रा. तिघेही राधानगर, नरसाळा) हे तिघे जबाबदार असल्याचे तपासात उघड झाल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सागर हा बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवारत होता आणि डॉ. कोमल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सेवारत आहे. दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर सागरच्या कुटुंबीयांकडून कोमलला सागरसाठी लग्नाची मागणी घालण्यात आली. दोघेही डॉक्टर असल्याने आणि घरची स्थिती चांगली असल्याने लग्न जुळले. कुटुंबीयांनी त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न लावून दिले. वानाडोंगरीतील पायोनियर सोसायटीत डॉ. सागर आणि डॉ. कोमलने आपला संसार थाटला. सर्व व्यवस्थित होते. अचानक या दोघांच्या संसारात कोमलची आई मनीषा आणि भाऊ आशिष ढवळाढवळ करू लागले. सागरने कसे वागावे, कसे राहावे, काय घ्यावे, कुठे जावे याबाबत ते हस्तक्षेप करू लागले. यामुळे कोमल आणि सागरमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. सागर दडपणात आला असताना कोमलने त्याला सांभाळून घेण्याऐवजी त्याच्यावर जास्त मानसिक दबाव आणला. ती माहेरी निघून गेली. परिणामी सागर अस्वस्थ झाला. त्याने २६ एप्रिलला गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी प्रारंभी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

तपासात धक्कादायक प्रकार उघड
हवलदार विजय नेमाडे यांनी या प्रकरणाचा तपास केला. आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी डॉ. सागरच्या मोबाईलची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उजेडात आला. पत्नी, सासू आणि मेव्हण्याकडून होणाऱ्या प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सागरने मृत्युपूर्वी बनविलेल्या व्हिडीओ क्लीपमधून स्पष्ट झाले. या संबंधाने डॉ. सागरचे बंधू नरेंद्र मोरेश्वर मरघडे (वय ५५, रा. सावंगी मेघे, वर्धा) यांनी शनिवारी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी मृत सागरची पत्नी डॉ. कोमल, तिची आई मनीषा आणि भाऊ आशिष तोडकर या तिघांविरुद्ध डॉ. सागरला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

तू आधी खूप प्रेम केले !
सागरने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी बनविलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये पत्नी कोमलला उद्देशून अतिशय भावविव्हळ संवेदना व्यक्त केल्या आहेत. तू आधी माझ्यावर खूप प्रेम केले. आता मात्र मला विरहात सोडून निघून गेली. एकटा कसा जगू, असा भावनिक प्रश्नही त्याने पत्नी कोमलला त्यातून केल्याचे पोलीस सांगतात. यावरून सागरचे पत्नीवर खूप प्रेम होते आणि तो तिच्या विरहामुळे हताश झाला होता, हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Doctor committed suicide in Nagpur due to harassment by wife and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.