‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या विरोधात डॉक्टर संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:30 PM2019-07-30T23:30:10+5:302019-07-30T23:31:25+5:30
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे. असे असताना केंद्र सरकारने मांडलेले व लोकसभेत संमत झालेल्या ‘एनएमसी’ विधेयकाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) विरोध करीत देशव्यापी संप पुकारला आहे. यात नागपुरातील खासगी डॉक्टर ३१ जुलैपासून २४ तास संपावर जाणार आहेत. या संपातून आकस्मिक रुग्णसेवेला वगळण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे. असे असताना केंद्र सरकारने मांडलेले व लोकसभेत संमत झालेल्या ‘एनएमसी’ विधेयकाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) विरोध करीत देशव्यापी संप पुकारला आहे. यात नागपुरातील खासगी डॉक्टर ३१ जुलैपासून २४ तास संपावर जाणार आहेत. या संपातून आकस्मिक रुग्णसेवेला वगळण्यात आले आहे.
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ विधेयकामुळे शिकाऊ डॉक्टरांच्या हिताला बाधा पोहचत आहे. हे विधेयक गरीब आणि विद्यार्थीविरोधी आहे. यात लोकशाहीअंतर्गत कुठलीही प्रक्रिया न करता ८० टक्के सदस्यांची निवड करण्याची तरतूद आहे; शिवाय वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेल्यांना देखील या कमिशनमध्ये स्थान मिळणार आहे. सोबतच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० टक्के जागांवरील शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य त्या महाविद्यालयांना देण्यात येण्याची तरतूद आहे. यामुळे गरीब घरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महागणार आहे. याचा विरोध म्हणून ‘आयएमए’ने संपाचे हत्यार उपसल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी सांगितले. बुधवारला सकाळी ८ वाजतापासून २४ तासांसाठी खासगी डॉक्टर संपावर जाणार आहेत. संपात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), एक्स-रे, पॅथालॉजी बंद ठेवले जाणार आहे. केवळ आकस्मिक रुग्णांवर उपचार केले जातील, असेही डॉ. झुनझुनवाला यांनी सांगितले.