हल्ले थांबविण्यासाठी डॉक्टर-रुग्णांमध्ये संवाद वाढायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:51+5:302021-07-01T04:06:51+5:30
-डॉक्टर्स डे सुमेध वाघमारे नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज, महागडा उपचार आदी कारणांमुळे डॉक्टर व ...
-डॉक्टर्स डे
सुमेध वाघमारे
नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज, महागडा उपचार आदी कारणांमुळे डॉक्टर व रुग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर- रुग्णांमध्ये बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे. कोरोनाच्या या काळात हे प्रकर्षाने समोर आले आहे. यामुळे डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णांबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे; परंतु हा संवाद सुसंवाद असायाला हवा, असा सूर ‘डॉक्टर्स डे’च्या पूर्वसंध्येला शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांकडून उमटल्या.
-मानवी दृष्टिकोनातूनच डॉक्टरांची सेवा -डॉ. गुप्ता()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, मानवी दृष्टिकोन सतत डोळ्यांसमोर ठेवून डॉक्टर आपली सेवा देत राहतो. समाजावर डॉक्टरांचे ऋण असते. रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रती सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. डॉक्टरांनी उत्तमातील उत्तम, माफक दरातील रुग्णसेवा देऊन रुग्णसेवा करायला हवी. रुग्णानेही सर्वच गोष्टी पैशातून साध्य होत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. कुठलाही रुग्ण स्वखुशीने डॉक्टरांकडे येत नाही. त्याचा नाइलाज असतो, तेव्हाच तो येतो, तेव्हा डॉक्टरांनी त्या रुग्णाला धीर देत, त्याचे सांत्वन करीत योग्य मार्गदर्शन करणे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपचार करणे आवश्यक आहे.
-कायदा व रुग्णहितमध्ये अडकले डॉक्टर -डॉ. देवतळे ()
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे म्हणाले, एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. याचा बऱ्याचदा विचार होत नाही. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते आणि त्यांचा ताण वाढत आहे. यातच शासनही नवनवीन कायदे करून विशेषत: छोटे क्लिनिक, नर्सिंग होमच्या डॉक्टरांना अडचणीत आणत आहे. हे थांबायला हवे. ‘डॉक्टरर्स डे’च्या निमित्ताने डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
-डॉक्टर रुग्ण संबंध हा विश्वासावर आधारित ()-डॉ. गावंडे
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, डॉक्टर व रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे. हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये सुसंवादाची गरज आहे. हा संवादच नसल्याने वादाला तोंड फुटते. डॉक्टरांशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय डॉक्टर नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी डॉक्टर डॉक्टरच राहतील. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशीलता निर्माण होणे आवश्यक आहे. आरोग्यसेवेत माणुसकीशी बांधीलकी मानून रुग्णसेवा करणार डॉक्टरांचा समाज आदर करतो. हेही तेवढेच खरे आहे.
डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता हवी -डॉ. चव्हाण
मेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. रवी चव्हाण म्हणाले, डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज आणि संख्या, महागडा उपचार आणि अनेक कारणे त्यामागे आहेत. यातूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. परिणामी, डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधीलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
-फॅमिली डॉक्टरांची संकल्पना हवी -डॉ. जतकर
मेयोच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अलका पाटणकर-जतकर म्हणाल्या, ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेत डॉक्टरांना आपल्या घरातील एक व्यक्ती मानले जात असे. जनरल फिजिशियनच्या सल्ल्यानेच पुढील उपचाराची दिशा ठरत असे. सध्या स्पेशलायझेशनचे युग आहे. समाजाचे हे प्रतिबिंब डॉक्टरी पेशातही उमटले आहे. त्यामुळे जनरल प्रॅक्टिशनर (जीपी) किंवा फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच नष्ट होऊ पाहत आहे. यातच वेळेचा अभाव, कमी संवाद, महागडी उपचार पद्धती आणि उपचाराचा वाढलेला कालावधी यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास कमी होत आहे. फॅमिली डॉक्टर या संकल्पनेमुळेच विश्वास, माणुसकी, परस्परांचा विचार, सौजन्य अबाधित राहू शकते.