डॉक्टर म्हणतात, यंदा ‘नीट’ नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2016 02:31 AM2016-05-15T02:31:44+5:302016-05-16T09:12:53+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘नीट’च (नॅशनल एलिजिबिलिटी कम् एन्ट्रन्स टेस्ट) द्यावी लागेल या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने विद्यार्थ्यांना मोठा धक्का लागला आहे.
मूक मोर्चा काढून वेधले लक्ष : २०१८ पासून ‘नीट’ अनिवार्य करण्याची मागणी
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘नीट’च (नॅशनल एलिजिबिलिटी कम् एन्ट्रन्स टेस्ट) द्यावी लागेल या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने विद्यार्थ्यांना मोठा धक्का लागला आहे. अभ्यास करायला वेळ मिळायलाच पाहिजे अशी विद्यार्थी व पालकांची भावना आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता ‘नीट’ २ वर्षांनंतर लागू करण्यात यावी, अशी मागणी उपराजधानीतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे. शहरातील डॉक्टरांनी यासंदर्भात शनिवारी मूक मोर्चा काढला व विद्यार्थी हित लक्षात घेऊन पावले उचलण्यात यावी, अशी मागणी केली.
राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘एआयपीएमटी’ (आॅल इंडिया प्री-मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट) ही परीक्षा यंदा ‘नीट’ या नावाने घेतली गेली. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारांना स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केल्यामुळे विद्यार्थ्यांनी ५ मे रोजी केवळ ‘सीईटी’ (सामायिक प्रवेश परीक्षा) दिलेल्या विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ‘नीट’ऐवजी केवळ ‘सीईटी’ दिलेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. परंतु हा कालावधी फार कमी असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
याला घेऊन गुरुवारी आयएमए सभागृहात विद्यार्थी व पालकांनी ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे आणि ‘नीट’ला फार कमी दिवसांचा वेळ मिळाला असल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या भावना शासनस्तरावर पोहोचविण्यासाठी, शनिवारी सकाळच्या सुमारास हा मूक मोर्चा काढण्यात आला. यात ‘आयएमए’चे सदस्य डॉक्टर, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून हा मूक मोर्चा निघाला व संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर याची सांगता झाली. यावेळी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, सचिव डॉ. अर्चना कोठारी, माजी अध्यक्ष संजय देशपांडे, माजी सचिव डॉ.सरिता उगेमुगे, डॉ. वर्षा ढवळे, डॉ. प्रशांत भांडारकर, डॉ.अनिल लद्धड, डॉ.प्रमोद गांधी, डॉ.सचिन खांडेकर, डॉ.संजय देवतळे, डॉ. अंबुलकर आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.(प्रतिनिधी)