डॉक्टरला खंडणीसाठी धमकी
By admin | Published: June 4, 2016 02:47 AM2016-06-04T02:47:13+5:302016-06-04T02:47:13+5:30
एका दंतचिकित्सकाकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली.
जिवे मारण्याचा इशारा : तिघे गजाआड
नागपूर : एका दंतचिकित्सकाकडे दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना धंतोली पोलिसांनी अटक केली. या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार डॉक्टरकडील एक माजी कर्मचारीच निघाला. तो अट्टल गुन्हेगार आहे.
लोकमत चौकात डॉ. सुधीर रमेश मेश्राम (वय ३४) यांचे राधारतन क्लिनिक आहे. डॉ. मेश्राम १८ मे रोजी आपल्या क्लिनिकमध्ये असताना दुपारी १२ वाजता त्यांना ७७२१०६३५७८ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. पलिकडून बोलणाऱ्या आरोपीने दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम दिली नाही तर जिवे मारू, अशी धमकीही दिली. दुसऱ्या दिवशीसुद्धा असाच फोन आला. मात्र, डॉक्टरने त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. २८ मे च्या रात्री ९ च्या सुमारास तीन आरोपी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आले.
क्लिनिकमध्ये तोडफोड
नागपूर : मेश्राम यांच्याकडे काम करणाऱ्यांकडे डॉक्टरबाबत विचारणा केली. डॉक्टर हजर नसल्याचे कळाल्याने क्लिनिकमध्ये तोडफोड केली. ‘काट डालेंगे’अशी धमकी देऊन पळून गेले. या प्रकरणाची तक्रार डॉ. मेश्राम यांनी गुरुवारी धंतोली ठाण्यात नोंदवली.
ठाणेदार राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चित्रा मेसरे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉक्टरच्या क्लिनिकमधील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल नंबरवरून आरोपींचा शोध सुरू केला.
नमूद क्रमांकाच्या मोबाईलचा वापर आरोपी मुकेश रामाजी गुप्ता (वय २२) करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी मुकेशला आणि त्याच्या माहितीवरून सुनील श्रीकांत पांडे (वय २०) तसेच संजय छन्नू डिंडोरे (वय २१, तिघेही, रा. सुरेंद्रगड, गिट्टीखदान) यांनाही पकडले. त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा ८ जूनपर्यंत पीसीआर मिळवल्याची माहिती सहायक आयुक्त एन. डी. इंगोले यांनी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)