डॉक्टरच ठरले देव... ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर १ तासाने जिवंत, ४५ दिवसांनी घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 01:02 PM2023-10-22T13:02:42+5:302023-10-22T13:04:36+5:30
रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाच्या ह्रदयाची हालचाल सुरू झाली.
नागपूर - दैव बलवत्तर असलेला माणूस मृत्युच्या दाढेतूनही परत येतो, अशा अनेक घटना आपण वाचल्या किंवा पाहिल्या आहेत. कित्येक अपघातातून एखादी व्यक्ती वाचते, तेव्हा देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सार्थकी लागत असते. नागपुरातील एका ३८ वर्षीय व्यक्तीच्या बाबतीतही तीच म्हण खरी ठरली आहे. येथील ३८ वर्षीय व्यक्तीला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यामुळे कुटुंबीयांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी, त्यांच्या ह्रदयाचे ठोके बंद पडले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर ४५ मिनिटांनी त्यांच्या ह्रदयाचे ठोके सुरू झाले. आता, तब्बल दीड महिन्यानंतर त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाच्या ह्रदयाची हालचाल सुरू झाली. यावेळी, डॉ. ऋषी लोहिया यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. रुग्णाचे वय लक्षात घेऊन आणि व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन मॉनिटरवर दिसल्याने त्यांनी ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ सीपीआर करण्याचा निर्णय घेतला. ह्रदयाचे ठोके पुन्हा सुरू होईपर्यंत त्यांनी ही प्रक्रिया केली. हॉस्पीटलच्या म्हणण्यानुसार तब्बल ४५ मिनिटे रुग्णावर सीपीआर करण्यात आले. अमेरिकन हर्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला जास्तीत जास्त ४० मिनिटे सीपीआर देऊन प्रयत्न केले जातात. या काळात रक्ताभिसरण किंवा ह्रदयाचे ठोके सुरू न झाल्यास सीपीआर थांबवण्यात येते. मात्र, येथील डॉ. लोहियांनी अधिक वेळ सीपीआर सुरू ठेऊन केलेल्या प्रयत्नांना यश आले.
संबंधित रुग्ण आयटी कंपनीत नोकरीला आहेत. २५ ऑगस्ट रोजी संबंधित रुग्णाला KIMS-Kingsway रुग्णालयात आणण्यात आले होते. सुरुवातीचे ३ ते ४ दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर, ४० दिवस त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. आयसीयु टीम त्यांच्या देखरेखेखाली होती. या आयसीयू टीममध्ये नेफ्रोलॉजिस्ट डॉ अश्विनी खांडेकर आणि सर्जन डॉ. सुरजीत हाजरा यांचा समावेश होता.