नवजात बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील डॉक्टरची ‘भलतीच’ प्रॅक्टिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 10:41 AM2022-03-23T10:41:35+5:302022-03-23T10:51:42+5:30
१७ मार्चला गुन्हे शाखेेने नवजात बाळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला कथित डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत या तिघांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवजात बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील आरोपी विलास दामोदर भोयर याच्या संबंधाने अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. भोयरचे हात अनेक गोरखधंद्यांत बरबटले असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेणारा हा समाजकंटक भंडारा जिल्ह्यात एक हॉटेल चालवीत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यामुळे तो आणखी कोणकोणत्या गैरप्रकारांत सहभागी आहे, त्याची पोलिसांनी कसून चाैकशी चालवली आहे.
गोरगरीब, अत्याचारग्रस्त महिला- मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना बाळ जन्माला घालण्यास बाध्य करण्याचा आणि जन्माला आलेल्या बाळाची विक्री करून लाखोंचे वारेन्यारे करण्याचा प्रकार नागपूर शहरात अनेक वर्षांपासून सुरू आहे. ‘लोकमत’ने जुलै २०१८ मध्ये उपराजधानीतील या गोरखधंद्याचा भंडाफोड करून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी नंदनवन ठाण्यात शहरातील चार नामवंत डॉक्टरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण त्यावेळी राज्यभरात गाजले होते.
‘सरोगसी मदर्स’ची शारिरिक, मानसिक कुचंबणा करून आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने हे रॅकेट चालविणारे अनेक जण त्यावेळी भूमिगत झाले होते, तर या गोरखधंद्यात गुंतलेले अनेक जण पुढचे काही महिने शांत बसले होते. नंतर मात्र त्यांनी पुन्हा हा प्रकार सुरू केला. त्याची कुणकुण लागल्याने १७ मार्चला गुन्हे शाखेेने नवजात बाळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला कथित डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत या तिघांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चाैकशीत विलास भोयर याने भंडारा जिल्ह्यातील माैदा येथे एक हॉटेल सुरू केले. ६ रूमच्या या ‘ओयो’ हॉटेलमध्ये नको ते प्रकार चालत होते, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यातूनही भोयरने बक्कळ कमाई केली आहे. ज्यांच्या उदरात बाळ वाढायचे, त्या महिला-मुलींना तो याच हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवत असावा, असाही संशय आहे. त्यामुळे पोलीस आता त्या अनुषंगाने कसून तपास करीत आहेत.
पोलिसांसोबतही खोटा बोलला
स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत गेल्या १० वर्षांपासून भोळ्याभाबड्या नागरिकांची, रुग्णांची फसवणूक करणारा विलास भोयर याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कोणताही सरकारी परवाना नाही. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने आपण बीएएमएस असल्याचे म्हटले होते. मात्र, पोलीस तपासात तो खोटा बोलल्याचेही उघड झाले आहे.
भोयर निघाला मुन्नाभाई
सक्करदऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात त्याने बीएएमएसला प्रवेश घेतला होता. ‘हे शिक्षण आपल्या आवाक्यातील नाही, हे लक्षात आल्याने दुसऱ्या वर्षीच त्याने कॉलेज सोडल्याचे चाैकशीत उघड झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘या संबंधाने आमचा सखोल तपास सुरू आहे. अनेक धक्कादायक खुलासे अपेक्षित’ असल्याचे म्हटले आहे.