डॉक्टर... तुम्हीसुद्धा।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:51+5:302021-04-27T04:08:51+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिविरची जीवघेणी टंचाई आणि काळाबाजारी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांनाही अस्वस्थ ...
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिविरची जीवघेणी टंचाई आणि काळाबाजारी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांनाही अस्वस्थ करणारी आहे. या काळाबाजारीत स्वयंकथित समाजसेवक आणि अट्टल गुन्हेगार सहभागी असल्याचे आधीच स्पष्ट झाले असताना आता काही डॉक्टर मंडळींनीही या काळाबाजारीला हातभार लावल्याचे उघड झाले आहे. शहरातील एका डॉक्टरने रेमडेसिविरची काळाबाजारी करणाऱ्या रॅकेटकडून चक्क १ लाख रुपये देऊन पाच रेमडेसिविर खरेदी केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
गेल्या १० दिवसांत शहरातील एकूण १० पोलीस ठाण्यात आतापर्यंत रेमडेसिविरची काळाबाजारी करणारे वेगवेगळे आरोपी पकडले गेले. काळाबाजारीचा भंडाफोड ज्या प्रकरणाने झाला. त्यात सर्वप्रथम कामठीत लोकेश शाहू नामक डॉक्टरच पकडला गेला. त्याच्यासोबत नंतर पोलिसांनी वॉर्डबॉय तसेच त्यांचे दलाल पकडले. नंतर जरीपटका, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, धंतोली, सीताबर्डी, सदर, बेलतरोडी आणि प्रतापनगर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेमडेसिविरची काळबाजारी करणारे आरोपी पकडले. या सर्वांच्या कारवाईत विविध रुग्णालयातील वार्ड बॉय आरोपी म्हणून पुढे आले. तर, सदरमधील गुन्ह्यात कुख्यात गुन्हेगार गोपाल ग्यानीप्रसाद शर्मा (वय ३४, रा. जरीपटका) याला पोलिसांनी अटक केली. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.
तिकडे बेलतरोडी पोलिसांनी नगरसेविकेचा दीर आणि नेतागिरी करत फिरणारा मनोज कामडे याच्या मुसक्या बांधल्या. त्याचा साथीदार अतुल आवळे याने त्याची गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नर्स असलेली मेव्हणी पल्लवी मेश्रामने चोरलेले १२ इंजेक्शन ब्लॅकमार्केटमध्ये विकणे सुरू केले होते. त्यातील ५ इंजेक्शन नागपुरातील एका इस्पितळात काम करणाऱ्या डॉक्टरने चक्क १ लाख रुपयांत विकत घेतल्याचे आज चाैकशीत उघड झाले आहे. या डॉक्टर महाशयांनी हे इंजेक्शन दुसऱ्या एका व्यक्तीच्या मार्फत दिल्लीला पाठविल्याचे सांगितले जाते. दिल्लीची बाब किती खरी किती खोटी, त्याचा पोलीस आता शहानिशा करीत आहेत.
---
हेतू चांगला ... पण ।
कोरोनामुळे सध्या आणीबाणीसारखी स्थिती आहे. बेड, ऑक्सिजनची टंचाई अन् औषधांचा काळाबाजार केला जात असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. अशात एका डॉक्टरने स्वत:च इंजेक्शनची विक्री करणे अन् दुसऱ्या एका प्रकरणात डॉक्टरने स्वताच एक लाख रुपयांत रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्याचा प्रकार फारच गंभीर ठरतो. जीव वाचविण्याच्या हेतूने त्यांनी हा प्रकार केला असावा. मात्र, त्यातून त्यांनी चोरी तसेच काळाबाजारी करणाऱ्यांना साथ दिल्याचेही अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पोलीस आता या डॉक्टरसाहेबांचीही चाैकशी करणार आहेत.
---