कोविड रुग्ण सेवेत सर्वच विभागाचे डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:35 PM2020-05-22T21:35:50+5:302020-05-22T21:38:59+5:30
‘कोविड-१९’ रुग्ण सेवेचा भार औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्याच डॉक्टरांवर पडल्याची गंभीर दखल शासनाने घेतली, इतरही विभागातील डॉक्टरांवर विशेषत: अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांकडे कामे सोपवावीत असे निर्देश देण्याची वेळ शासनावर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’ रुग्ण सेवेचा भार औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्याच डॉक्टरांवर पडल्याची गंभीर दखल शासनाने घेतली, इतरही विभागातील डॉक्टरांवर विशेषत: अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांकडे कामे सोपवावीत असे निर्देश देण्याची वेळ शासनावर आली. परंतु मेयो, मेडिकलमध्ये पूर्वीपासूनच कोविड रुग्णसेवेत सर्वच विभागातील डॉक्टरांची ड्युटी लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. मेडिकलने एक पाऊल पुढे टाकत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रीक आजपासून सुरूही केले. ‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, आॅनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण मेडिसीन व बधिरीकरणशास्त्र या दोनच विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याची बाब समोर आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांना कामच नाही. सकाळी ११ वाजता येऊन दुपारी २ वाजता घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. या संदर्भात तक्रारी झाल्याने शासनाने याची स्वत: दखल घेतली. १९ मे रोजी परिपत्रक काढून मेडिसीन व बाधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्टर वगळता सर्व विभागातील डॉक्टर व कर्मचाºयांनी दररोज कर्तव्यावर हजर राहण्याचे व अधिष्ठात्यांनी नेमून दिलेली कामे करण्याचे निर्देश दिले. जे डॉक्टर व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्याविरूद्ध शासकीय कामकाजात कसूर केल्यामुळे शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे व अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टर व कर्मचाºयांवर साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. परंतु मेयो, मेडिकलने कोविड रुग्णांची संख्या वाढताच प्रत्येक डॉक्टरची सात दिवसाच्या कालावधीसाठी कोविड वॉर्डात ड्युटी लावली असल्याचे येथील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. मेडिकलमध्ये एका विभागात अर्धे डॉक्टर ड्युटीवर तर अर्धे डॉक्टर सुटीवर राहत असल्याची माहिती आहे. मेयोतही काही वरिष्ठ डॉक्टर दुपारी २ नंतर रुग्णालयातून गायब होत असल्याची चर्चा आहे. परंतु आता शासनाचे कडक निर्देश आल्याने किती डॉक्टर व कर्मचारी जबाबदारपणाने सेवा देतात त्याकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष लागले आहे.