डाॅक्टरच्या अंगरक्षकांची तरुणास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:25+5:302021-06-26T04:08:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : हाॅस्पिटलचे पूर्ण बिल दिल्यानंतरही डाॅक्टरने एक लाख रुपये उधार असल्याचे सांगून ती रक्कम बळजबरीने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : हाॅस्पिटलचे पूर्ण बिल दिल्यानंतरही डाॅक्टरने एक लाख रुपये उधार असल्याचे सांगून ती रक्कम बळजबरीने वसूल करायला सुरुवात केली. त्यासाठी डाॅक्टरने खासगी अंगरक्षक आणून तरुणास बेदम मारहाण केली. त्यानंतर घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत असलेल्या अंगरक्षकांना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना खापरखेडा येथे शुक्रवारी (दि. २५) घडली.
या प्रकरणात पाेलिसांनी लॉरेन्स सायमन, सागर राऊत व पीयूष शर्मा, तिघेही रा. नागपूर या खासगी अंगरक्षकांना ताब्यात घेतले आहे. सागर यादवराव गाेंडुळे (३०, रा. खापरखेडा, ता. सावनेर) याचा माेठा भाऊ बादल यास काेराेनाची लागण झाल्याने त्याने बादलला नागपूर शहरातील वंजारी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथील डाॅ. राेशन काेडमलवार यांनी त्याला ५० टक्के डिस्काउंट मिळवून देण्याची बतावणी करीत स्टार सिटी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची सूचना केली.
त्याअनुषंगाने सागरने बादलला सिटी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. ताे बरा झाल्यावर सागरने हॅस्पिटलचे ३ लाख ७० हजार रुपयांचे बिले देऊन सुटी घेतली. यात त्याला काेणतेही डिस्काउंट देण्यात आले नव्हते. त्यातच डाॅ. काेडमलवार यांनी सागरला फाेन करून हाॅस्पिटलचे उधार असलेले एक लाख रुपये देण्याची सूचना केली. आपल्याकडे काेणतीही उधारी नसल्याचे सांगताच डाॅ. काेडमलवार त्यांच्या तीन खासगी अंगरक्षकांसह २७ मे राेजी खापरखेडा येथे आले.
त्यांनी सागरला खापरखेडा येथील रेल्वे क्राॅसिंगजवळ बाेलावून एक लाख रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या तिन्ही अंगरक्षकांनी सागरला चिचाेली मैदानावर नेले आणि तिथे बेदम मारहाण केली. त्यामुळे सागरने त्यांना ३० हजार रुपये दिले. त्यानंतर डाॅ. काेडमलवार यांनी सागरला मंगळवारी (दि. २२) पुन्हा फाेन करून उर्वरित ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांचे तिन्ही अंगरक्षक शुक्रवारी (दि. २५) सागरच्या घरी आले आणि त्यांनी रकमेची मागणी करीत सागरला जीवे मारण्याची धमकी दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी सागरचे घर गाठून तिन्ही अंगरक्षकांना ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणेदार भटकर यांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी सागर गाेंडुळे याच्या तक्रारीवरून भादंवि ३८६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे करीत आहेत.