नागपुरात डॉक्टरांचा बेमुदत संप बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:44 PM2019-08-05T22:44:11+5:302019-08-05T22:46:38+5:30
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ बुधवार ७ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. याबाबतची सूचना सोमवारी मेडिकल मार्डने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिली. या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ बुधवार ७ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. याबाबतची सूचना सोमवारी मेडिकल मार्डने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिली. या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
‘एनएमसी’ विधेयकाच्या विरोधात गेल्याच आठवड्यात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले होते. सोमवारी ‘सेंट्रल मार्ड’ने यावर निर्णय घेत संपाचा इशारा दिला. या संदर्भाचे एक पत्र नागपूर मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे यांच्या नेतृत्वात सोमवारी डॉ. मित्रा यांना, तर मेयो मार्डने अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना दिले.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘एनएमसी’ विधेयकामुळे गरीब घरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महागणार आहे. विधेयकात ‘ब्रीजकोर्स’ला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे रुग्णहित धोक्यात आले आहे. ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमामध्ये एकच परीक्षा राहणार आहे. परिणामी, भ्रष्टाचार फोफावून गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. यामुळे ‘मार्ड’ या विधेयकाच्या विरोधात आहे. या मागणीसोबतच निवासी डॉक्टरांचा विद्यावेतनाचा तिढा अद्यापही सुटला नाही. आजही दोन महिन्याचे विद्यावेतन प्रलंबित आहे; शिवाय इतर राज्याच्या तुलनेत कमी विद्यावेतन दिले जाते. यात पाच हजार रुपयांनी वाढ करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात आकस्मिक विभागातील डॉक्टरही सहभागी होणार असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.