दिव्यांगांना चालणे शिकविणारी नागपुरातील डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:46 AM2018-03-08T10:46:47+5:302018-03-08T10:50:10+5:30
पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट डॉ. मीनाक्षी वानखेडे त्या महिला डॉक्टरचे नाव. नागपूरच्या पहिल्या पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट म्हणून त्यांची ओळख आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सेरेब्रल पाल्सीसह काही आजारांमध्ये चिमुकल्यांचा शरीराचा काही भाग किंवा संपूर्ण शरीराच्या हालचालीमध्येच संतुलन नसते. अशा मुलांना नीट उभेही राहता येत नाही. त्यांना चालणे शिकविणारी एक महिला डॉक्टर गेल्या २२ वर्षांपासून आपली सेवा देत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात, त्यांनी स्वावलंबी व्हावे, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांच्यासाठी वेगळी बाग असावी यासाठीही त्यांचा संघर्ष सुरू आहे.
पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट डॉ. मीनाक्षी वानखेडे त्या महिला डॉक्टरचे नाव. नागपूरच्या पहिल्या पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. लहान मुलांना फिजिओथेरपी देऊन त्यांना त्यांच्या स्वबळावर चालता यावे, या प्रयत्नाला त्यांनी सर्वप्रथम सुरुवात केली आणि यातच स्वत:ला वाहूनही घेतले. त्या सेरेब्रल पाल्सीच नाही तर डाऊन सिंड्रोम, कन्जेनायटल डिफॉर्मेटिव्ह, आॅर्थाेपेडिक डिसॅब्लिटीस्, मल्टीपल हॅण्डीकॅप, आॅटीझम, एडीएचडी, एलडी, हायपरअॅक्टिव्ह अशा विविध ‘चाईल्डहूड डिसआॅर्डर’ मुलांसाठी काम करतात. दिव्यांग मुलांना चालवणे हे त्यांच्या प्रशिक्षणाचे पहिले पाऊल असते. यामुळे दिव्यांग मुलाचे पहिले पडलेले पाऊल, पहिला शब्द, पहिला स्वत: घेतलेला घास याचा आनंद तो स्वत:च अनुभवावाच लागतो, असे त्या म्हणतात. त्यांना सर्वात मोठा आनंद झाला जेव्हा ‘हॅण्ड फ्री मोबॅलिटी वॉकर’ला शासनाकडून ‘पेटेंट’ मिळाले. ज्या मुलांना स्वत:च्या पायावर चालणे सोडा नीट उभेही राहता येत नव्हते त्यांच्यासाठी हे ‘वॉकर’ वरदान ठरले आहे. दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र बाग असावी. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तशी खेळणी असावी यासाठी २०१३ पासून त्या धडपड करीत आहेत. त्रिमूर्तीनगरच्या उद्यानाचा एक कोपरा दिव्यांगाच्या उद्यानासाठी मिळाला. परंतु अद्यापही खेळणी व इतर सोयी उभ्या करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आजही सुरू आहे.
डॉ. वानखेडे सांगतात, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला मी त्याच्या क्षमतेप्रमाणे एक स्वप्न देते, त्याला परिश्रमाचे पंख लावते. माझ्या हाताची पकड मजबूत करून आकाशाकडे झेप टाकते, त्यांच्या स्वप्नांचे भान ठेवते. आपण कुठेही कमी पडणार नाही असा आत्मविश्वास मनाशी ठासून हा कणखर प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करते, कारण मला त्यांचा आनंद बघायचा असतो.