राजकारणी किंवा जनतेने डॉक्टरांशी गैरवर्तन करू नये ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:09 AM2021-04-23T04:09:24+5:302021-04-23T04:09:24+5:30
मेहा शर्मा नागपूर : कोविड महामारीदरम्यान रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र अथक प्रयत्न करीत आहेत. अशावेळी राजकारणी किंवा जनतेने ...
मेहा शर्मा
नागपूर : कोविड महामारीदरम्यान रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र अथक प्रयत्न करीत आहेत. अशावेळी राजकारणी किंवा जनतेने डॉक्टरांशी गैरवर्तन करू नये, असे मत युनायटेड रेसिडेन्ट्स अॅण्ड डॉक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी बोर्ड सदस्य आणि कायदेशीर सेलचे प्रमुख डॉ. जेरील बानाईत यांनी व्यक्त केले.
डॉ. बानाईत महामारीच्या काळात न थकता कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या हक्कासाठी कार्यरत आहेत.
वैयक्तिक संरक्षण उपकरणांची खरेदी व उपलब्धता यासाठी लढणारे आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणारे ते पहिले व्यक्ती आहेत. लोकमतशी चर्चेदरम्यान त्यांनी लोकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी चर्चेदरम्यान अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.
प्रश्न : नवीन स्ट्रेनमुळे कोविडचा वेगाने प्रसार होत असल्यावर आपण सहमत आहात का?
नवीन स्ट्रेनसह नागरिकांच्या सामाजिक वर्तनामुळे कोविड संक्रमण वेगात पसरत आहे. कोविड संक्रमण हे खबरदारी, सामाजिक अंतर आणि सामाजिक वर्तन या तीन गोष्टींवर अवलंबून आहे. योग्य सामाजिक वर्तनाअभावी वैद्यकीय पायाभूत सुविधांवर भार वाढत आहे. नियम तोडणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ७ ते १० लोक कोविड पॉझिटिव्ह होत आहेत. लक्षण नसणारे रुग्णसुद्धा सुपर स्प्रेडर ठरत आहेत. ते बेपर्वा व निष्काळजीने राहून आरोग्य सेवा प्रणालीवरील भार वाढवत आहेत.
प्रश्न : ऑक्सिजनची मागणी अचानक का वाढली?
आम्हाला परिस्थिती समजून घेण्यासह तोडगा काढण्यावर भर द्यावा लागेल. अन्य देशातही हीच स्थिती आहे. देशात या दिशेने वेगाने पाऊल टाकावे लागेल. वेगाने पसरणाऱ्या कोविड संक्रमणाने अस्ताव्यस्त होणारी आरोग्य व्यवस्था, सुस्त प्रशासन आणि योग्य वैद्यकीय पायाभूत सुविधांची पोलखोल झाली आहे. पुढे काय करायचे आणि कुठे जायचे आहे, यावर लोकांना जागरूक केले पाहिजे.
प्रश्न : फ्रंटलाईन वर्कर्सकडून पुरेसा पाठिंबा मिळत आहे काय?
डॉक्टरांशी आदराने वागले पाहिजे. राजकारणी किंवा लोकांनी डॉक्टरांशी गैरवर्तन करू नये. देश आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आहे. कोविड महामारीदरम्यान आतापर्यंत ८०० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा आम्हाला राजकारण्यांचा पाठिंबा मिळत नाही तेव्हा डॉक्टरांचे मनोबल तुटते. अशा स्थितीत जर आरोग्य सेवा कामगारांनी रुग्णांची सेवा घेण्यास नकार दिल्यास सरकार काय करू शकते?
प्रश्न : डब्ल्यूएचओनुसार रेमडेसिविर जीवनरक्षक औषध नसतानाही शहरात इतक्या वेगाने खरेदी का केली जाते?
रेमडेसिविर जीवनरक्षक औषधी नाही. या इंजेक्शनने रुग्णाला व्हेंटिलेटरवर जाण्यापासून थांबविता येत नाही. हा औषध कंपन्यांचा एक खेळ आहे.