डॉक्टरांनी रुग्णांसोबत मनमोकळेपणाने वागावे : डॉ. के. एच. संचेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 08:41 PM2020-01-28T20:41:22+5:302020-01-28T20:45:51+5:30
विश्वास संपादित करण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांसोबत मनमोकळेपणाने वागावे व एकरूप व्हावे, असे आवाहन पद्मविभूषण सन्मानप्राप्त ख्यातनाम ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. एच. संचेती यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात बोलताना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वास संपादित करण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांसोबत मनमोकळेपणाने वागावे व एकरूप व्हावे, असे आवाहन पद्मविभूषण सन्मानप्राप्त ख्यातनाम ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. एच. संचेती यांनी सोमवारी ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’ कार्यक्रमात बोलताना केले. पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक-अध्यक्ष असलेले डॉ. संचेती या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा रिधोरकर व लोकमत नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी डॉ. संचेती यांची प्रगट मुलाखत घेतली. दरम्यान, त्यांनी सर्व प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. बरेच डॉक्टर गंभीर स्वभावाचे असतात. ते जास्त बोलत नाहीत. कुणाकडे पाहून हसत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात असा स्वभाव उपयोगाचा नाही. डॉक्टरांनी समाजात मिसळणे व रुग्णांच्या समस्या गांभीर्याने जाणून घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
काळानुरूप नागरिकांची दिनचर्या बदलली आहे. अनेक जण सकाळी सूर्य निघण्यापूर्वी कार्यालयात जातात व सूर्य मावळल्यानंतर घरी परततात. त्यांना सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे त्यांना ‘ड’ जीवनसत्व मिळत नाही. त्यातून त्यांची हाडे ठिसूळ होतात. त्यासाठी नागरिक स्वत: जबाबदार आहेत. ते स्वत:च्या प्रकृतीची योग्य काळजी घेत नाही. काम कितीही करा, पण शरीराची काळजी घेणे विसरू नका. रोज किमान एक तास योगासन, स्नायू ताणणे इत्यादी व्यायाम करा, असा मोलाचा सल्ला डॉ. संचेती यांनी दिला.
पोलिओमुळे येणारी शारीरिक विकृती काही प्रमाणात बरी होऊ शकते, हे अनेकांना माहीत नव्हते. त्यामुळे गावोगावी शिबिरे आयोजित करून जनजागृती केली. गरजू पोलिओग्रस्तांवर स्वत:च्या रुग्णालयात नि:शुल्क उपचार केले. मोफत कुबड्या वाटल्या. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी असे कार्य करणे गरजेचे आहे, याकडे डॉ. संचेती यांनी लक्ष वेधले.
जॉईंट रिप्लेसमेंट ही आधुनिक उपचार पद्धत महाग असल्यामुळे कुणी तिच्या वाट्याला जात नव्हते. परिणामी, स्वत: संशोधन करून ‘नी जॉईंट’ तयार केला. त्याचे पेटंट मिळवले. बाहेरच्या कंपन्या मोठ्या ऑर्डरशिवाय ‘नी जॉईंट’ तयार करून देत नव्हत्या. त्यामुळे स्वत: ‘नी जॉईंट’ निर्मितीचे ज्ञान मिळवून मशीन्स खरेदी केल्या आणि रुग्णालय परिसरातच वर्कशॉप थाटले. आता संपूर्ण जगात हे ‘नी जॉईंट’ वापरले जात आहेत, अशी माहिती डॉ. संचेती यांनी दिली.
पुण्यात ऑर्थोपेडिकचे विशेष रुग्णालय सुरू केल्यानंतर रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आधुनिक सुविधांसह मोठे रुग्णालय बांधले. मदतीकरिता निवासी डॉक्टरांची गरज वाटायला लागल्याने ट्रस्ट स्थापन केला व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची मान्यता मिळवली. त्याकरिता मंत्रालयात अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. त्यातून संयम शिकायला मिळाला. मोठे कार्य करायचे असल्यास लहानपण घेणे आवश्यक आहे, असे अनुभवाचे बोल डॉ. संचेती यांनी सांगितले.
डॉ. संचेती यांच्या यशात त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पत्नीचे मूळ नाव लीला आहे. ते नाव बदलण्यामागील गोष्ट डॉ. संचेती यांनी यावेळी सांगितली. ते एकदा पत्नीसोबत अनुराधा चित्रपट पाहायला गेले होते. त्यातील मुख्य पात्र अनुराधा ही पतीला त्याच्या प्रत्येक कार्यात मदत करते. त्या प्रभावामुळे डॉ. संचेती यांनी त्यांच्या पत्नीला अनुराधा संबोधणे सुरू केले.