नागपुरात डॉक्टरांचा संप मागे, स्थायी करण्यावर लवकरच निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 11:23 PM2020-11-05T23:23:32+5:302020-11-05T23:25:10+5:30
Doctors strike in Nagpur called off, Nagpur news अस्थायी डॉक्टरांची सेवा नियमित करण्यावर व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यावर लवकरच शासन निर्णय घेण्यात येईल, या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अस्थायी डॉक्टरांचा संप गुरुवारी मागे घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अस्थायी डॉक्टरांची सेवा नियमित करण्यावर व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यावर लवकरच शासन निर्णय घेण्यात येईल, या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अस्थायी डॉक्टरांचासंप गुरुवारी मागे घेण्यात आला. शुक्रवारी मेयो, मेडिकलमधील डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ४५० वर अस्थायी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले होते. दरम्यान महाराष्ट राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार यांच्या नेतृत्वात आ. विकास ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचे मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात मेयोमधील १५ तर मेडिकलमधील ३३ डॉक्टर सहभागी झाले होते. यांची संख्या अत्यल्प असल्याने दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवेवर किंवा प्रशासकीय कामकाजावर फारसा प्रभाव पडला नाही. आंदोलनात ‘एमएसएमटी’ला सहभागी करून घेण्याचा निर्णय अस्थायी डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार तसा प्रस्तावही देण्यात आला. अस्थायी डॉक्टरांच्या आंदोलनातून ‘एमएसएमटी ’ ने आपल्या मागण्याही शासनाकडे रेटून धरल्या होत्या. परिणामी, गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अस्थायी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. यात अस्थायी डॉक्टरांना स्थायी करण्याच्या व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्या संदर्भातील फाईल ३ नोव्हेंबर रोजी वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याचे व त्यानंतर लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आश्वासनानंतर संपाचा निर्णय मागे घेण्यात आला.