डॉक्टरांसह बेरोजगार, हातमजूर, पानठेलाचालकही नागपूरच्या मैदानात

By योगेश पांडे | Published: November 5, 2024 11:48 PM2024-11-05T23:48:29+5:302024-11-05T23:49:00+5:30

सर्वाधिक उमेदवार आहेत बिझनेसमॅन : पेन्शनर्स, गृहिणी, ऑटोचालकांचेदेखील प्रस्थापितांना आव्हान

Doctors, unemployed, manual laborers, panthela drivers also in Nagpur Maidan | डॉक्टरांसह बेरोजगार, हातमजूर, पानठेलाचालकही नागपूरच्या मैदानात

डॉक्टरांसह बेरोजगार, हातमजूर, पानठेलाचालकही नागपूरच्या मैदानात

नागपूर : राजकारण व निवडणूक हा केवळ श्रीमंतांचाच प्रांत आहे असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, नागपुरातील रिंगणात सर्वार्थाने देशाच्या लोकशाहीचे दर्शन होत असून प्रस्थापितांच्याविरोधात सर्वच स्तरांवरील उमेदवार उतरले आहेत. एकीकडे डॉक्टर, इंजिनिअर रिंगणात असून दुसरीकडे बेरोजगार, हातमजूर, पानठेलाचालक व अगदी ऑटोचालकदेखील त्यांचे भाग्य आजमावत आहेत. नागपुरातील सर्वांत जास्त ३० टक्के (३६) उमेदवार हे कुठल्या ना कुठल्या बिझनेसशी जुळलेले आहेत.

निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर शहरातील सहाही मतदारसंघांतून ११७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ३६ (३० टक्के) उमेदवारांनी त्यांची उपजीविका व्यवसायावर चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. ११ (९.४०%) उमेदवार वकिली करतात तर १० (८.५४ %) उमेदवारांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन शेती हे आहे. तीन डॉक्टरदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय पाच मजूर, प्रत्येकी दोन ऑटोचालक-बेरोजगार-ड्रायव्हर हेदेखील मैदानात आहेत.

केवळ ५ उमेदवार नोकरदार

नोकरदार वर्गाला राजकारणापासून दूर राहणारा पांढरपेशा वर्ग असे म्हटले जाते. या निवडणुकांसाठी काही नोकरदार कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे तिकिटांसाठी मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश जणांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. २५ (२१.३६ %) उमेदवारांनी ते खासगी काम करत असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे तर २ (१.७० %) उमेदवार या गृहिणी आहेत. दोन शिकवणी वर्गचालकदेखील निवडणुकीत उतरले आहेत.

मतदारसंघनिहाय व्यावसायिक प्रोफाईल

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ

या मतदारसंघातील १२ उमेदवारांपैकी प्रत्येकी तीन जण शेतकरी व खासगी काम करणारे आहेत. दोघांचा व्यवसाय आहे तर एकजण वकील आहे. या हायप्रोफाईल मतदारसंघात एक पानठेलाचालक, एक मजूर तर एक उमेदवार क्रेन चालक आहे.

उत्तर नागपूर मतदारसंघ

या मतदारसंघातील १४ उमेदवारांपैकी सहा जणांनी शपथपत्रात व्यवसाय करत असल्याचे नमूद केले आहे. प्रत्येकी २ उमेदवार हे वकीली व खासगी काम करणारे आहेत. तर प्रत्येकी एक उमेदवार डॉक्टर, शेतकरी, शिक्षक व गृहिणी आहे.

दक्षिण नागपूर मतदारसंघ

येथील २६ उमेदवारांपैकी ११ उमेदवार हे व्यावसायिक आहेत. प्रत्येकी तीन पेन्शनर्स, खासगी नोकरदार व वकील आहेत. एकाच्या उत्पन्नाचे साधनच राजकारण आहे तर दोन बेरोजगारदेखील आहेत. याशिवाय प्रत्येकी एक गृहिणी, मजूर व डॉक्टरदेखील आहेत.

मध्य नागपूर मतदारसंघ

मध्य नागपुरातील २० पैकी प्रत्येकी सात उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. येथून तीन वकील, दोन पेन्शनर्स उमेदवार आहेत तर प्रत्येकी एकजण खासगी नोकरदार, शेतकरी, ऑटोचालक, कंत्राटदार, फोटोग्राफर, मजूर, फॅशन डिझायनर व भाजी विक्रेता आहे.

पुर्व नागपूर मतदारसंघ

या मतदारसंघांत १७ पैकी आठ उमेदवारांचा व्यवसाय आहे. प्रत्येकी दोन जण खासगी काम व वकिली करतात तर प्रत्येकी एकजण शेतकरी, ऑटोचालक, मजूर आहे. दोन जण शिकवणी वर्ग घेतात.

पश्चिम नागपूर मतदारसंघ

येथील २० पैकी नऊ जण खासगी नोकरदार आहेत तर चार उमेदवार व्यवसाय काम करतात. दोन जण पेन्शनर्स आहेत. प्रत्येकी एक उमेदवार शेतकरी, डॉक्टर, वकील, मजूर, व सामाजिक कार्यकर्ता आहे.

Web Title: Doctors, unemployed, manual laborers, panthela drivers also in Nagpur Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.