माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ; डॉक्टर पती व सासूविरोधात गुुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 07:06 PM2022-07-04T19:06:56+5:302022-07-04T19:07:21+5:30
Nagpur News बालाघाट येथे कार्यरत असणाऱ्या एक महिला डॉक्टर माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पती व सासूकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नागपूर : बालाघाट येथे कार्यरत असणाऱ्या एक महिला डॉक्टर माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पती व सासूकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ३४ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती व सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातदेखील खळबळ उडाली आहे.
मूळची बालाघाट येथील लालबर्रा येथील असलेल्या संबंधित महिला डॉक्टरचे २०१८ साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. सागर खंडारेशी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीचे खटके उडाले व पत्नी माहेरी निघून गेली. काही दिवसांनी पतीने पत्नीला परत घरी येण्यासाठी मनविले व दोघेही एकत्र राहू लागले. २०२० मध्ये त्यांना मुलगा झाला व त्यानंतर त्यांची सासू रेखा खंडारे त्यांच्यासोबत राहायला आली. सासू लहानसहान गोष्टींवर टोमणे मारायची. पतीकडूनदेखील सासूचीच बाजू घेत पत्नीला टोमणे मारण्यात यायचे. ते तिला नोकरी करण्यासाठीदेखील मनाई करू लागले.
या प्रकारामुळे कंटाळलेल्या महिला डॉक्टरने बालाघाट गाठले व तेथील जिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करू लागली. परंतु मुलाची प्रकृती खराब असल्याने महिला डॉक्टर परत नागपुरात राहायला आली व येथून ती बालाघाटला रोज अपडाऊन करायची. या कालावधीत सासू व पतीकडून टोमणे मारणे सुरूच होते. १ जुलै रोजी महिला डॉक्टरची मामेसासू घरी आली असता सासूने सून चोर असल्याचा आळ घेतला. तू माहेरून पैसे आणून दे असे म्हणत सासूने दमदाटीला सुरुवात केली.
महिला डॉक्टरने पतीला घरी आल्यावर ही बाब सांगितली असता सागर खंडारेने तिच्याशी वाद सुरू केला. तू तुझ्या माहेरून पैसे घेऊनच ये असे म्हणत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीनेदेखील त्याला धक्का दिला व त्यात तो खाली पडला. हे सासुने पाहिले व तिच्या चिथावणीवरून पतीने परत महिला डॉक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे तिला कानात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिने अगोदर इमामवाडा पोलीस ठाणे गाठून पती व सासूविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी डॉक्टर पती व सासूविरोधात भा.दं.वि.च्या कलम ३२५, ३४ व ४९८-अ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.