लघुपटातून उलगडणार हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 12:07 PM2019-09-13T12:07:04+5:302019-09-13T12:08:02+5:30
महाराष्ट्रासह देशातील पुरोगामी चळवळीत आपले नाव कोरणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी झटणारे हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा एक लघुपट दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी तयार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वादळी आणि संघर्षमय आयुष्य जगलेल्या हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा एक लघुपट दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी तयार केला आहे. महाराष्ट्रासह देशातील पुरोगामी चळवळीत आपले नाव कोरणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी झटणारे हमीद दलवाई यांच्या आयुष्याची एक वेगळी बाजू या निमित्ताने प्रकाशझोतात येणार आहे.
रविवारी १५ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता धरमपेठ येथील वनामती परिसरातील सभागृहात या लघुपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे. ‘हमीद दलवाई-द अनसंग ह्युमनिस्ट’ असे या लघुपटाचे नाव असून ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. ‘टॉकटेल’ या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये ज्योती सुभाष प्रेक्षकांशी संवादही साधणार आहेत. लघुपटात नसिरूद्दीन शाह, ज्योती सुभाष आणि हमीद दाभोळकर यांच्या प्रमुख भूमिका आहे.
टॉकटेलचे अजेय गंपावार यांनी या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. कलेच्या माध्यमातून जुळलेल्या स्नेहाच्या धाग्यातूनच नागपुरात हे आयोजन होऊ घातले आहे. या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना अजेय गंपावार म्हणाले, महाराष्ट्राच्या व भारताच्या संदर्भात सत्तरचे दशक संतप्त तरुणाईचे होते. त्या काळात समतेच्या बाजूने व शोषणाच्या विरोधात अनेक महत्त्वाच्या चळवळी झाल्या. मुस्लिम समाजाच्या सुधारणांसाठी हमीद दलवाई एखाद्या झंझावातासारखे झगडले. तीन तलाक या संदर्भात केवळ सात मुस्लिम महिलांसह मुंबईला मंत्रालयावर नेलेला त्यांचा मोर्चा त्या काळात खूप गाजला होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना ही त्यांच्या वादळी आयुष्यातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना ! धर्मश्रध्दांऐवजी विज्ञाननिष्ठ समाज देशासाठी प्रगतिकारक ठरतो हा विचार रुजवण्यासाठी ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आयुष्यभर झगडले. आज ५० वर्षांनंतर त्यांचे विचार समाजाला मान्य करावे लागत आहेत हेच त्यांचे असामान्यत्व म्हणावे. ते उत्तम लेखकही होते. चळवळींशी निगडित वैचारिक लिखाणासोबतच लाट, जमिला जावद हे कथासंग्रह व पुरस्कार प्राप्त इंधन ही त्यांची कादंबरी अस्सल साहित्याचा दाखलाच आहे. ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष यांनी सामाजिक जाणिवेतून या लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. नागपूरकरांसाठी ही वैचारिक मेजवानीच असणार आहे.