नागपूर पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर ‘डॉक्युमेंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:55 AM2018-06-30T11:55:00+5:302018-06-30T11:56:12+5:30
पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर नॅशनल जिओग्राफी चॅनलने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. यामध्ये भरोसा सेल, बडी कॉप्स, सिनिअर सिटीझन्स केअर या प्रमुख आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर नॅशनल जिओग्राफी चॅनलने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. २१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री (माहितीपट) ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता दाखवण्यात येणार आहे.
पोलिसांच्या एकूणच वर्तनाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये फारशी चांगली प्रतिक्रिया दिसून येत नाही. परंतु नागपूर पोलिसांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीसाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये भरोसा सेल, बडी कॉप्स, सिनिअर सिटीझन्स केअर या प्रमुख आहेत. यातून नागपूर पोलिसांचा मानवी दृष्टिकोन प्रदर्शित होतो. यासोबतच लॅण्ड माफियाविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेत एसआयटी स्थापन करून कठोर कारवाई केली. नॅशनल जिओग्राफीला नेमकी हीच बाब आकर्षित करून गेली. त्यांनी नागपूर पोलिसांवर डॉक्युमेंट्री तयार केली. यात पोलिसांचा मानवी दृष्टिकोन यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. २१ मिनिटांच्या या डॉक्युमेंट्रीला ‘इनसाईड नागपूर पोलीस ’ असे नाव देण्यात आले आहे. ही डॉक्युमेंट्री ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता नॅशनल जिओग्राफी चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. ही नागपूर पोलिसांसाठीच नव्हे तर सर्व नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.