मेडिट्रिनातील अपहराचे दस्तावेज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:33 PM2019-01-23T23:33:04+5:302019-01-23T23:33:47+5:30
करोडो रुपयाच्या अपहार प्रकरणातील आरोपी असलेले रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांचे घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. पोलिसांनी आयकर विभागाकडून रुग्णालयाशी संबंधित दस्तावेजाच्या प्रमाणित प्रतीही प्राप्त केल्या. पोलीस डॉ. पालतेवार त्यांची पत्नी सोनाली आणि इतर साथीदारांच्या या फसवणुकीतील भूमिकेचाही तपास करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : करोडो रुपयाच्या अपहार प्रकरणातील आरोपी असलेले रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांचे घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. पोलिसांनी आयकर विभागाकडून रुग्णालयाशी संबंधित दस्तावेजाच्या प्रमाणित प्रतीही प्राप्त केल्या. पोलीस डॉ. पालतेवार त्यांची पत्नी सोनाली आणि इतर साथीदारांच्या या फसवणुकीतील भूमिकेचाही तपास करीत आहे.
गुन्हे शाखेने मंगळवारी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून डॉ. पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध चार कोटी रुपये अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत अपहार करणे, रुग्णांकडून वसुली करणे, त्यांच्या नावावर हॉस्पिटलचे पैसे खाणे, बोगस व्हाऊचरद्वारा हॉस्पिटलच्या खात्यातून पैसे काढणे आणि बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करण्याचा आरोप आहे. चक्करवार यांनी जुलै २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेत तकार दाखल केली होती. परंतु आर्थिक शाखेने कुठलीही कारवाई न कल्याने चक्करवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलिसांना २३ जानेवरीपर्यंत कारवाई करण्याची मुदत दिली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तपासानंतर गुन्हा दाखल केला.
सूत्रानुसार पोलिसांनी रुग्णालय, डॉ. पालतेवार आणि या अपहराशी संबंधित इतर लोकांचे कार्यालय आणि घराची झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. सप्टेंबर २०१७ मध्ये आयकर विभागाने रुग्णालयात धाड टाकून मोठ्या प्रमाणावर दस्तावेज जप्त केले होते. पोलिसांनी आयकर विभागकडून त्या दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतीही प्राप्त केल्या. पोलिसांनी डॉ. पालतेवार यांना विचारपूस केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, चक्करवार हेच आर्थिक विशेषज्ज्ञ आहेत. तेच रुग्णालयातील आर्थिक व्यवहाराची पाहणी करायचे. २०१७ मध्ये डॉ. पालतेवार आणि चक्करवार यांची रुग्णालयात ५०-५० टक्के हिस्सेदारी होती. नंतर चक्करवार यांनी आपली १७ टक्के हिस्सेदरी डॉ. पालतेवार यांना दिली होती. त्यामुळे डॉ. पालतेवार यांची रुग्णालयातील हिस्सेदारी ६७ टक्के झाली. ते सध्या रुग्णालयाचे सीएमडी आहेत.
तपासात लागेल वेळ
पोलीस रुग्णालयातील आर्थिक व्यवहार आणि शासकीय योजनांमध्ये फसवणूक प्रकरणाचा तपास करीत आहेत. शासकीय योजनांमधील गैरप्रकाराचा पत्ता लावण्यासाठी आरोग्य विभागाकडून दस्तावेज प्राप्त करण्यात आले आहेत. रुग्णालयातील गैरप्रकाराचा पत्ता लावण्यासाठी संबंधित लोकांची विचारपूस केली जात आहे. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायला वेळ लागणे निश्चित आहे. त्यामुळे सध्या तरी कुणालाही अटक झालेली नाही.
पोलिसांचे वाढले काम
फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच अनेक रुग्ण तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले आहेत. बहुतांश रुग्णांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडून उपचाराच्या नावावर भरमसाट पैसे घेण्यात आले. शासकीय योजनांचे लाभार्थी असूनही त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. याची तक्रार केल्यानंतरही आरोग्य विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. या तक्रारींमुळे पोलिसांचे काम वाढले आहे.