कोविड सेंटरसाठी मुहूर्त लागतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:50+5:302021-03-28T04:08:50+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रात आणि तालुक्यातील ग्रामीण भागात गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ...
कळमेश्वर : कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रात आणि तालुक्यातील ग्रामीण भागात गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाधित रुग्णांच्या विलगीकरण आणि उपचारासाठी कोविड सेंटरची नितांत गरज आहे. मात्र हे केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून होणाऱ्या विलंबामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना प्रशासनाने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी नागरिकांच्या मागणीची वाट का पाहावी, असा प्रश्न विचारला जात आहे. तालुक्यात २६ मार्चपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ४९५ इतकी झाली होती. यातील ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आजही चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. अशावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय मदतीशिवाय दुसरा पर्याय नाही. गतवर्षी ब्राह्मणी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र रुग्णसंख्या घटल्याने ते बंद करण्यात आले होते. आता मात्र रोज १०० हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. यातील बहुतांश रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. अशावेळी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तालुका प्रशासनाने मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात तहसीलदार सचिन यादव यांना विचारणा केली असता मंगळवारपासून केंद्र सुरू होईल, असे सांगितले. मात्र येत्या तीन दिवसात तालुक्यातील अनेक बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाहीत. यात त्यांचा मृत्यू झाला तर यास जबाबदार कोण राहील? इकडे तालुक्यात बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद मुख्याधिकारी स्मिता काळे, कळमेश्वर ब्राह्मणीच्या नगराध्यक्ष स्मृती ईखार, उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, माजी पंचायत समिती श्रावण भिंगारे यांनी केले आहे. मात्र तालुक्यात तातडीने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी याही मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.