ज्या बाईचे कुंकू मिटते ती प्रसिद्धीचा स्टंट करते का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:59 AM2018-06-05T00:59:09+5:302018-06-05T00:59:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या अनेक भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत़ नागपुरात जय जवान जय किसान संघटनेने सोमवारी आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे़ ज्या बाईचे कुंकू मिटते ती काय प्रसिद्धीचा स्टंट करते का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केला. आंदोलन सुरू असतानाच संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचे हृदयविकाराने निधन झाले यामुळे आंदोलनावर शोककळा पसरली़
केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविरोधी धोरणाच्या विरोधात शेतकºयांनी संपाचे हत्यार उगारले आहे़ संपाच्या समर्थनात नागपुरातील प्रजापतीनगर चौक येथे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार व नगरसेवक दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले़ सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला़ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत दूध रस्त्यावर ओतत निदर्शनेही केली़
या वेळी रस्त्यावर दूध ओतणाऱ्या आंदोलकांत आणि पोलिसांत बाचाबाची झाली. सरकारने शेतकºयांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढला नाही तर माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहराचे दूध बंद करू, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला़ रवींद्र इटकेलवार, आकाश थेटे, राजू मोरे, बंडू घोडमारे, विलास पैठणकर, प्रशांत वांढरे, जितू नवघरे, हर्ष गोडे, अरविंद पारधी, नवीन वेदक, बंटी रहांगडाले, अमित जेठे, प्रशांत भोयर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेचे शरद खेडीकर यांचा हृदयविकाराने मृत्यू
आंदोलन सुरू असतानाच आंदोलनात सहभागी शरद खेडीकर (रा़ खरबी) यांची प्रकृती खालावली़ त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला़ उपचारासाठी त्यांना तत्काळ एकविरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले़ मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली़ अर्जनवीस म्हणून काम करणाऱ्या खेडीकर यांना एक मुलगा व एक मुलगी आहे़ ते ४५ वर्षांचे होते़ त्यांच्या निधनामुळे संघटनेत शोककळा पसरली आहे़