माणुसकीवर डाग! कुत्रा भुंकतो, म्हणून त्याला हायवेवर मरायला सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 01:04 PM2022-03-12T13:04:06+5:302022-03-12T13:15:01+5:30
कुत्रा सातत्याने भुंकतो, म्हणून त्याला चक्क वर्धा मार्गाच्या मधोमध साखळीने बांधून मरण्यासाठी सोडण्यात आले.
नागपूर : युक्रेनमधून परतणाऱ्या काही भारतीयांनी पाळीव जनावरांनाही सोबत घेत, त्यांचा जीव वाचविला होता व माणुसकीचे जगाला दर्शन झाले होते. मात्र, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपुरात माणुसकीला डाग लावण्याचा प्रकार घडला आहे.
वस्तीतील एक कुत्रा सातत्याने भुंकतो, म्हणून त्याला चक्क वर्धा मार्गाच्या मधोमध साखळीने बांधून त्याला मरण्यासाठी सोडण्यात आले. कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे कुत्र्याचे प्राण त्यावेळी तर वाचले, परंतु त्यानंतर त्या कुत्र्याचे काय झाले, याचा शोध अद्यापही सुरू आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वर्धा मार्गावर एका कार थांबली व त्यातील तरुणाने दुभाजकावर कुत्र्याला साखळीने बांधले. बाजूने वेगवान वाहने जात होती व कुत्रा कधीही वाहनांखाली येऊ शकत होता. हा प्रकार ‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या एका कार्यकर्तीने पाहिला व तिने विचारणा केली. यावर संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित कुत्रा आमच्या वस्तीतील असून, तो सातत्याने भुंकतो, म्हणून त्याला आम्ही इतक्या दूर सोडले आहे, अशी सबब दिली. याबाबत संस्थेच्या संचालिका स्मिता मिरे यांनी त्या तरुणांना विचारणा केली. आम्हाला तो कुत्रा नकोच आहे व आम्ही त्याला मारून टाकू, असे त्यांनी उत्तर दिले. त्यांना पोलीस तक्रारीचा दम दिला असता, त्यांनी तो कुत्रा कारमध्ये टाकायला लावला व तेथून पोबारा केला. या कुत्र्याला आम्ही सोडणार नाही, असाच त्यांचा आविर्भाव होता. त्यानंतर, त्या कुत्र्याचे काय झाले, याचा आम्ही शोध घेत असल्याचे मिरे यांनी सांगितले.
गुन्हा का नाही?
याबाबत आम्ही सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रारही केली. मात्र, तेथून योग्य सहकार्य मिळाले नाही. मुळात भटक्या श्वानांना त्यांच्या जागेवरून अशा प्रकारे हलविणे हाच कायद्याने गुन्हा आहेत. अशा प्रकारात प्राणी क्रूरता अधिनियम १९६० या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.