सर्पदंशामुळे कुत्र्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:15 AM2021-03-13T04:15:35+5:302021-03-13T04:15:35+5:30
रामटेक : शहरातील किट्स कॉलेजच्या एका क्वाॅर्टरमध्ये गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास कुत्र्याचा भुंकण्याचा जोरात आवाज ऐकू ...
रामटेक : शहरातील किट्स कॉलेजच्या एका क्वाॅर्टरमध्ये गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास कुत्र्याचा भुंकण्याचा जोरात आवाज ऐकू येत हाेता. शेजाऱ्यांनी बंद असलेल्या त्या क्वाॅर्टरच्या खिडकीतून टाॅर्चच्या प्रकाशझाेतात आत बघितले असता त्यांना कुत्रा तडफडत असल्याचे तसेच त्याच्या ताेंडातून फेस येत असल्याचे आढळून आले. आत शाेध घेतला असता त्यांना वाॅशिंग मशीनखाली माेठा साप आढळून आला. त्यामुळे त्या कुत्र्याचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे स्पष्ट झाले.
ही बाब किट्स कॉलेजमधील सुरक्षा रक्षक सुरेंद्र भोयर यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सदस्य तथा सर्पमित्र सागर धावडे यांना फोनवरून माहिती दिली. सागर धावडे, राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे यांनी मध्यरात्री ३.४५ वाजताच्या सुमारास घटनास्थळ गाठले. त्यांनी त्या सापाला शिताफीने ताब्यात घेतले. ताे ब्राऊन काेब्रा जातीचा विषारी साप असून, त्याची लांबी पाच फूट आठ इंच असल्याची माहिती सागर धावडे यांनी दिली. त्याला दूरवरच्या जंगला साेडल्याचेही त्यांनी सांगितले.