कुत्र्याला द्यायचे कारण सांगून मागितले होते इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:19+5:302020-12-05T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याचे पाच इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्याचा पुरवठादेखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याचे पाच इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्याचा पुरवठादेखील आनंदवन येथील रुग्णालयाला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दिशेनेदेखील तपासाची चक्रे फिरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मृत्यू झाल्याच्या दिवशी सकाळपासून महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे बाहेरच पडल्या नव्हत्या. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या; परंतु त्यादिवशी मात्र त्या बाहेरच आल्या नाहीत.
डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूला पाच दिवसाचा कालावधी लोटूनही मृत्यूचे गूढ उकलले नाही; परंतु डाॅ. शीतल आमटे यांनी मृत्यूपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून नागपूर येथून पाच इंजेक्शन मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे. मात्र, त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. यामुळे मृत्यूचे कारण रहस्यमय बनले आहे. मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही तोपर्यंत डाॅ. शीतल आमटे यांची आत्महत्या असेल तर ती कोणत्या कारणाने केली, याचा शोध लावणे अवघड झाले आहे. डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली वा अन्य कारणाने मृत्यू झाला, याचाच शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाइल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. याचा ताळमेळ डाॅ. शीतल यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाशी जोडण्याचे काम पोलीस करीत असल्याचे समजते.
पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले
डाॅ. शीतल यांच्या मृत्यूप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही, याचा तपास सुरू आहे.
उजव्या हाताला इंजेक्शनची खूण असल्याने संभ्रम
डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू विषारी इंजेक्शन टोचल्याने झाल्याचा संशय पोलीस वर्तवीत आहेत. इंजेक्शनची खूण त्यांच्या उजव्या हाताला असल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. डाॅ. शीतल आमटे या डावखुऱ्या नव्हत्या. मग त्यांनी उजव्या हाताला इंजेक्शन कसे घेतले? ही बाब पोलिसांना विचार करायला लावणारी असल्याचे समजते. यामागे अन्य कारण तर नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. यासाठी पोलीस यंत्रणा विविध पातळीवर तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे.