नागपुरात कुत्र्यांमुळे मनोरुग्णांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:35 PM2017-11-14T22:35:46+5:302017-11-14T22:41:52+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालय सध्या नोंदणी शुल्काला घेऊन चांगलेच चर्चेत आले असताना, आता रुग्णालयाच्या आतील परिसरात वावरणाºया १५-२० मोकाट कुत्र्यांच्या कळपाची भर पडली आहे. ही कुत्री रुग्णांना जिथे ठेवले जाते त्या वॉर्डाच्या परिसरापासून ते बाह्यरुग्ण विभागापर्यंत सर्वत्र दिसून येतात. काही मनोरुग्ण या कुत्र्यांच्या मागे धावतात, त्यांंना पकडतात, अशा वेळी ही कुत्री त्यांना चावा घेण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण अशा गोष्टी सांगत नाही. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला आहे, मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे.
वाढत्या ताणतणावामुळे स्क्र ीझोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या वाढत आहे. सध्या प्रादेशिक मनोरुग्णालयात सुमारे सहाशेवर पुरुष व महिला रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु वेड्यांकडे काय लक्ष द्यावे, याच भावनेतून रुग्णालयाचा कारभार अद्यापही सुरू असल्याचे चित्र आहे. रुग्णालयात दोन मनोरुग्णाचा गळा दाबून हत्या व एका अल्पवयीन रुग्णावर झालेल्या अत्याचारामुळे रुग्णालय प्रशासन पुरते हादरून गेले आहे. यासंदर्भात अजूनही चौकशी सुरू असताना रुग्णाच्या नोंदणी शुल्काचा घोटाळा समोर आला आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष रुग्णालयाकडे लागले आहे. रुग्णालयातील आतील बारीकसारीक माहितीही बाहेर येऊ लागली आहे.
नुकताच एका रुग्णाचा नातेवाईक रुग्णाला भेटायला रुग्णालयात गेला असताना त्याचे स्वागत तेथील कर्मचाºयाने न करताच मोकाट कुत्र्यांनी केले. रुग्णालयाच्या दारापासून ते रुग्णाच्या वॉर्डापर्यंत सर्वत्र कुत्री त्यांना दिसून आली. काही रुग्ण तर या कुत्र्यांच्या मागे धावतानाही दिसले. अशा वेळी कुत्र्यांनी चावा घेतल्यास आणि रुग्णाने याची माहिती कुणाला न दिल्यास रॅबीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्वच्छतेचाही विषय आहे, असेही त्या नातेवाईकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.
मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष का?
मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत असली तरी रुग्णालय प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. बाह्यरुग्ण विभागात तर एका कुत्र्याने पिल्ले दिले असून, ती आपल्या पिल्ल्यांसह तिथेच राहते. मात्र कर्मचाºयांपासून ते वरिष्ठांपर्यंत कोणी तिला बाहेर काढत नाही, हे विशेष.