धर्म केल्याने आत्मिक शुद्धी होते
By admin | Published: July 26, 2016 02:24 AM2016-07-26T02:24:14+5:302016-07-26T02:24:14+5:30
मुनिश्री प्रतीकसागर महाराजांचा चातुर्मास श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिरात सुरू आहे.
मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचा उपदेश
नागपूर : मुनिश्री प्रतीकसागर महाराजांचा चातुर्मास श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिरात सुरू आहे. मुनिश्रींनी सोमवारी प्रवचन देताना सांगितले की, धर्माचे दोन प्रकार आहेत. द्रव धर्म आणि भाव धर्म. जो तन आणि वचनाला शुद्ध करतो तो द्रव धर्म आहे. जो मनाला पवित्र करतो तो भाव धर्म आहे.
परंतु मान धर्म हा दुखाच्या खाईत पोहोचवितो. जसा बगळा एका पायावर उभा राहून कधी भक्ष्य येते आणि कधी मी खातो, तसे मनाच्या वश होऊन ज्या धर्मक्रियेत पापाचा भाव असतो ती धर्माची क्रिया होऊच शकत नाही. द्वेषाच्या भावनेतून केलेले कोणतेही काम धर्म होऊ शकत नाही. रावण तत्त्वज्ञानी होता. परंतु तो मी खूप शक्तिवान आहो, असा विचार करीत होता.
मला इंद्रही घाबरतो, असा विचार तो करायचा. हीच माणसाची खरी चूक आहे. त्यामुळे कधीच कोणाला कमी समजू नका. एका मुंगीत हत्तीच्या सोंडेत घुसून त्याचा पराभव करण्याची क्षमता आहे.
आपण दुसऱ्याला नेहमीच तुच्छ समजतो. परंतु छळ आणि मानाचा व्यापार जास्त दिवस चालत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी दीपप्रज्वलन संतोष नेताजी, संतोष कवडे, नरेंद्र तुपकर यांनी केले. मंगलाचरण पंकज बोहरा यांनी केले. पाद प्रक्षालन आणि शास्त्रभेट सुधीर आग्रेकर परिवाराने केले.
मुनिश्रींचे प्रवचन मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)