नागपूरकर कलावंतांच्या बाहुल्या नवीन संसद भवनात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:49 AM2023-05-29T10:49:59+5:302023-05-29T10:51:01+5:30
रमनी येल्लापंतुला व सहकाऱ्यांनी तयार केलेल्या बाहुल्या ठरल्या लक्षवेधी
विराज देशपांडे
नागपूर : नवीन संसद भवनात देशाच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या अनेक कलाकृती सजविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्यातील लोकनृत्याचे प्रदर्शन घडविणाऱ्या ६४ बाहुल्यांचा समावेश आहे. नागपूरच्या प्रतिभावंत कलावंत रमनी येल्लापंतुला व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बाहुल्या तयार केल्या आहेत. या बाहुल्या नवीन संसद भवनाची शोभा वाढवित आहेत.
सरकारच्या प्रतिनिधींनी येल्लापंतुला यांना नवीन संसद भवनसाठी बाहुल्या तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. दरम्यान, येल्लापंतुला यांनी विषयावर सखोल विचारमंथन केल्यानंतर भारतातील लोकनृत्यांवर आधारित बाहुल्या तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी दोन आठवडे संशोधन केले. बाहुल्यांसाठी पेपर, नैसर्गिक गोंद, लाकडी पाया व जस्ताचा थर लावलेल्या लोखंडी ताराचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच, विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी वस्त्रे वापरण्यात आली आहेत. या बाहुल्या काश्मीरमधील रौफ, तामिळनाडूमधील पोईकल कुथिरई, गुजरातमधील दांडिया, कोच्चीमधील घोडी नृत्य, अरुणाचल प्रदेशमधील भुईया, महाराष्ट्रातील लावणी, गोव्यातील कोळी यासह अन्य विविध राज्यांमधील लोकनृत्याचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. येल्लापंतुला यांनी या बाहुल्या अवघ्या तीन महिन्यात तयार केल्या. बाहुल्यांचे काम गेल्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण झाले होते.
ही अभिमानाची बाब
नवीन संसद भवन अत्यंत प्रतिष्ठित इमारत आहे. या ठिकाणी बाहुल्या प्रदर्शित झाल्यामुळे अभिमान आहे. या बाहुल्या वेळेत तयार करण्यासाठी दिवसरात्र काम केले. बाहुल्यांमुळे या कलेला आधीसारखी लोकप्रियता प्राप्त होईल, अशी आशा आहे.
- रमनी येल्लापंतुला
हेमा मालिनींनीही केले शेअर
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी या बाहुल्यांसोबत छायाचित्र काढून घेतले. तसेच, ते छायाचित्र सोशल मीडियावर शेअरही केले. या छायाचित्राची असंख्य नागरिकांनी प्रशंसा केली.