घरगुती आणि विदेशी टूर रद्द; पर्यटनावर ९० टक्के परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:25 AM2020-03-12T11:25:45+5:302020-03-12T11:26:14+5:30

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका नागपुरातील टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसू लागला आहे.

Domestic and foreign tours canceled; 90% impact on tourism | घरगुती आणि विदेशी टूर रद्द; पर्यटनावर ९० टक्के परिणाम

घरगुती आणि विदेशी टूर रद्द; पर्यटनावर ९० टक्के परिणाम

Next

मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका नागपुरातील टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसू लागला आहे. चीनसह, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, बँकॉक, युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून सध्या ३ हजारांपेक्षा जास्त तिकिटे रद्द झाली आहेत. कोरोनामुळे घरगुती आणि विदेशी पर्यटनावर ९० टक्के परिणाम झाला आहे. हीच स्थिती पुढे काही दिवस राहणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात कुलर लावून घरी झोपण्याची पाळी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर आल्याची उपरोधिक टीका एका कंपनीच्या संचालकाने लोकमतशी बोलताना केली.
नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातून विदेशात पर्यटनाला जाणाऱ्यांची वार्षिक संख्या जवळपास ७५ हजार आहे. सर्वाधिक टूर एप्रिल ते जुलैपर्यंत असतात. विदेशात सहलीचे आयोजन करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स कंपनीने आर्थिक तोटा सहन करून १५ जुलैपर्यंतचे सहा टूर रद्द केले आहेत. या काळात कंपनी २०० पेक्षा जास्त पर्यटकांना विदेशात पाठविणार होती. लोकांशी चर्चा करून टूर रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. विदेशात सहलीचे आयोजन करणारे नागपुरात २५० पेक्षा जास्त एजंट आहेत. मोठ्या कंपन्यांची नागपुरात कार्यालये आहेत. या सर्वांनी देशांतर्गत आणि विदेशातील टूर रद्द केले आहेत. लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. सर्वांना जग पाहायचे आहे. सोबतच विदेशात जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नागपुरात हजारोंच्या संख्येने पर्यटक विदेशात जातात. पण यावर्षी कोरोना व्हायरसमुळे पर्यटकांनी टूर रद्द केले आहेत. त्याचा फटका टूर ऑपरेटर्सला बसत आहे. अशावेळी तिकिटांचे पैसे परत करून विमान कंपन्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

३३ वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती
सर्वाधिक रोजगार देणारा हा उद्योग सध्या मंदीत आहे. ३३ वर्षांच्या कार्यकाळात पर्यटन क्षेत्रात पहिल्यांदाच अशी स्थिती पाहत आहे. आता सर्वच देश सतर्क झाले आहेत. आम्ही लोकांची चर्चा करून जुलैपर्यंतचे सहा विदेशी टूर रद्द केले आहेत. हीच स्थिती अन्य कंपन्यांची आहे. जोखिम असल्याने कुणीही प्रवास करण्यास तयार नाहीत. कोरोनाची भीती दूर झाल्यानंतर लोक पुन्हा प्रवास करतील, असा विश्वास टूर ऑपरेटरने व्यक्त केला.

परत मिळत नाही हवाई तिकिटांची रक्कम
देशविदेशातील टूर रद्द होत असताना विमान कंपन्यांनी टूर ऑपरेटर्सला सहकार्य करण्याची भावना ठेवावी. पण असे होताना दिसत नाही. प्रत्येक विमान कंपनीचे वेगवेगळे नियम आहेत. कुणी काही रक्कम कापून पैसे परत करतात तर काही तिकिटाचे पैसे परत करीत नाहीत. याचा फटका पर्यटकांना बसत असून तिकिटांच्या पैशावर पाणी सोडावे लागत आहे. टूर रद्द होत असल्याचे बघताच काही विमान कंपन्यांनी कुठलीही रक्कम न कापता ३१ मार्चपर्यंत बुकिंगची तारीख पुढे वाढविण्याचे आवाहन टूर ऑपरेटर्स आणि पर्यटकांना केले आहे. पण कोरोना विषाणूचा प्रभाव संपूर्ण जगात पसरत असल्याने कुणीही पर्यटक पुढील तारीख वाढविण्यास तयार नाहीत. शिवाय विदेशात जाण्याची त्यांची मानसिक तयारी नाही.

दुबईहून आलेले २४ जण सुखरूप
देशातील थंड हवेच्या ठिकाणांसह विदेशातील टूर रद्द होत आहेत. शारीरिक त्रास होऊ नये म्हणून अनेकजण नकार देत आहेत. त्यामुळे उद्योग धोक्यात आला आहे. १ ते ६ मार्चपर्यंत २४ जणांना दुबईत नेले होते. सर्वांची शारजाह आणि नागपूर विमानतळावर तपासणी करण्यात आली असून सर्व सुखरूप आहेत. भूतानने पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. कतार एअरवेजने १४ देशांच्या फेऱ्या बंद केल्याचे ऑपरेटर म्हणाला.

Web Title: Domestic and foreign tours canceled; 90% impact on tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.