वर्षभरात घरगुती सिलिंडर २४० रुपयांनी वाढले - महागाईत सर्वसामान्यांना झटका : जुलैमध्ये २५ रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:58+5:302021-07-02T04:06:58+5:30

मोरेश्वर मानापुरे नागपूर : पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही ...

Domestic cylinders up by Rs 240 during the year - Inflation hits the general public | वर्षभरात घरगुती सिलिंडर २४० रुपयांनी वाढले - महागाईत सर्वसामान्यांना झटका : जुलैमध्ये २५ रुपयांनी वाढले

वर्षभरात घरगुती सिलिंडर २४० रुपयांनी वाढले - महागाईत सर्वसामान्यांना झटका : जुलैमध्ये २५ रुपयांनी वाढले

Next

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त होत आहे. महागाईत सर्वसामान्यांना झटका बसला आहे.

जूनमध्ये १४.२ किलोंच्या घरगुती सिलिंडरचे दर ८६१ रुपये होते. जुलैमध्ये २५ रुपयांची वाढ होऊन दर ८८६ रुपयांवर गेले असून, वर्षभरात २४२ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच १९ किलो वजनी व्यावसायिक सिलिंडरचे भाव वर्षभरात ४३५ रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका हॉटेल्स व रेस्टॉरंटला बसला आहे. माहितीनुसार ऑगस्ट २०२० मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे भाव ६४४ रुपये होते, तर जुलै २०२१ पर्यंत २४२ रुपयांची वाढ होऊन ८८६ रुपयांवर पोहोचले आहेत. स्वयंपाकघरातील वस्तूंची वाढ होत असल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोसळले आहे. दुसरीकडे खाद्यतेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढत आहेत. कोरोनामुळे नोकरदारांचे उत्पन्न कमी झाले आहे, त्यातच दरवाढ करून सरकार सर्वसामान्यांना झटका देत असल्याचे गृहिणींचे मत आहे. घरगुती गॅस हा रोज लागणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. दरवाढीमुळे देशातील नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे.

वर्षापासून सबसिडी केवळ ४०.१० रुपये!

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी बंद केल्यासारखीच आहे. सिलिंडरचे दर कितीही वाढल्यानंतरही ४०.१० रुपये सबसिडी ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत आहे. पूर्वी प्राईज रेटच्या आधारे ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा व्हायची. पूर्वी ५४० रुपये आणि नंतर ५८० रुपये प्राईज रेट तेल कंपन्यांनी केला. सिलिंडरची किंमत आणि प्राईज रेट वजा करून येणारी रक्कम सबसिडीच्या स्वरुपात ग्राहकांच्या खात्यात जमा व्हायची. आता प्राईज रेट काय आहे, हे आम्हालाही माहीत नाही, असे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचे ऑगस्ट २०२० ते जुलै २०२१ पर्यंतचे दर :

महिनाघरगुतीव्यावसायिक

ऑगस्ट २० ६४४ १२५७

सप्टेंबर ६४४ १२५७

ऑक्टोबर ६४६ १२८२

नोव्हेंबर ६४६ १३५८

डिसेंबर ६४६ १४१२

जानेवारी ७४६ १४६६

फेब्रुवारी ७४६ १६५६

मार्च ८७१ १७३२

एप्रिल ८६१ १७७५

मे ८६१ १७३०

जून ८६१ १६०८

जुलै २१ ८८६ १६९२

स्वयंपाकघराचे बजेट बिघडले

खाद्यतेलासह स्वयंपाकघरातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वर्षापासून वाढत आहेत. गृहिणींना महिन्याचा ताळमेळ साधणे कठीण झाले आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे. सामान्यांवर ताण येईल, अशी दरवाढ सरकारने करू नये.

ज्योती पत्की, गृहिणी

सिलिंडरची दरवाढ चिंतेची बाब

सिलिंडर आणि जीवनाश्यक वस्तूंची होणारी दरवाढ गृहिणींसाठी चिंतेचा विषय झाला आहे. भाजीपाला, पेट्रोलच्या भाववाढीने त्यात भर टाकली आहे. कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले, तर दुसरीकडे सरकार भाववाढ करून आगीत तेल ओतत आहे.

पूजा कुंभारे, गृहिणी.

सिलिंडरची दरवाढ चुकीची

वर्षभरापासून सर्वच वस्तूंचे भाव वाढत असल्याने घर चालविणे कठीण झाले आहे. सिलिंडर आणि पेट्रोलच्या किमतीने त्यात भर टाकली आहे. उत्पन्न कमी झाले आहे; पण महिन्याला दोन ते अडीच हजारांचा खर्च वाढला आहे.

माधुरी आदमने, गृहिणी.

दरवाढ मागे घ्यावी

सिलिंडरच्या किमती कमी करण्याऐवजी वाढवून सरकार सर्वसामान्यांवर दडपण आणत आहे. सर्व वस्तूंच्या दरवाढीने गृहिणी त्रस्त आहेत. प्रत्येक महिन्याला खरेदी करताना वस्तूंचे दर वाढलेले असतात. सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

विद्या समर्थ, गृहिणी.

Web Title: Domestic cylinders up by Rs 240 during the year - Inflation hits the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.