घरगुती वादातून महिलेने स्वत:सह मुलीलाही संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:01 PM2019-06-25T22:01:47+5:302019-06-25T22:06:51+5:30
सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मृतावस्थेत आढळलेल्या मायलेकीची अखेर ओळख पटली. सायली नितीन खवले (वय २२) आणि तिची मुलगी माहेश्वरी नितीन खवले अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या वर्धा जवळच्या सावंगी मेघे येथील रहिवासी होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मृतावस्थेत आढळलेल्या मायलेकीची अखेर ओळख पटली. सायली नितीन खवले (वय २२) आणि तिची मुलगी माहेश्वरी नितीन खवले अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या वर्धा जवळच्या सावंगी मेघे येथील रहिवासी होत्या.
सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मायलेकीचे मृतदेह आढळले होते. गणेशपेठ पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांना सचित्र माहिती पाठविली होती. मृत महिलेच्या थैलीत वर्धा नागपूर रेल्वेचे तिकीट आढळल्याने पोलिसांनी वर्धा पोलिसांनाही कळविले होते. सावंगी येथील महिला तिच्या १० महिन्यांच्या मुलीसह २२ जूनपासून बेपत्ता असल्याचा मिसिंग रिपोर्ट सावंगी (मेघे) ठाण्यात नोंदविण्यात आला होता. ही माहिती कळताच महिलेचा पती नितीन खवले याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. पत्नी आणि मुलीचा शोध घेत असलेला नितीन त्याची आई उषा यांना घेऊन सोमवारी रात्रीच नागपुरात आला. मंगळवारी सकाळी या दोघांनी मृतदेह बघितले अन् एकच आक्रोश केला. ते मृतदेह सायली आणि महेश्वरीचे होते. ओळख पटविल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी मायलेकीचे मृतदेह नितीनच्या हवाली केले. घरगुती वादातून सायलीने स्वत:सोबत मुलीलाही संपविल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. सायलीच्या या आत्मघातकी निर्णयामुळे तिच्या नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
प्रेमविवाहाचा दोनच वर्षात अखेर
नितीन आणि सायलीने मे २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना गेल्या वर्षी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी महेश्वरी ठेवले होते. नितीन वाहन चालवित होता. त्याचे आईवडील सावंगीत मेस चालवितात. सायलीची आई सविता नेवारे आणि बहीण चेतना यासुद्धा आज नागपुरात आल्या होत्या. नितीन आणि सायलीत घरगुती वाद सुरू होता. मात्र, सायली एवढ्या टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणालाच कल्पना नव्हती.