घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:17 AM2020-12-03T04:17:41+5:302020-12-03T04:17:41+5:30
- सिलिंडर मिळण्यास उशीर : हिवाळ्यात वापर वाढल्याने मागणी वाढली औरंगाबाद डमीनुसार .... नागपूर : हिवाळ्यात घरगुती वापराचे गॅस ...
- सिलिंडर मिळण्यास उशीर : हिवाळ्यात वापर वाढल्याने मागणी वाढली
औरंगाबाद डमीनुसार ....
नागपूर : हिवाळ्यात घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मिळण्यास थोडा उशीर होत असल्याने ग्राहक नाराज आहेत. ही गोष्ट दरवर्षी हिवाळ्यात हमखास घडते. या दिवसात ग्राहकांकडून मागणी वाढते, पण कंपन्यांकडून पुरवठा कमी असल्याने सिलिंडर मिळण्यास दोन वा तीन दिवस उशीर होत असल्याचे वितरकांनी सांगितले.
शहरात प्रामुख्याने हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत गॅस आणि इंडियन ऑईल कंपनीकडून एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. नागपूर जिल्ह्याबाहेर सिलिंडरवर ३ ते ४ रुपये सबसिडी मिळत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. पण पडताळणी केली असता सिलिंडरच्या बेस प्राईसनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ४०.१० पैसे सबसिडी मिळत असल्याचे दिसून आले आहेत. सध्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६४६ रुपये असून तीन महिन्यांपासून किंमत स्थिर आहे. या किमतीवर ४०.१० रुपये सबसिडी सिलिंडर घेतल्यानंतर तीन ते चार दिवसात ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसे पाहता सिलिंडरची मूळ किंमत ६१५.२४ रुपये एवढी आहे. पण या किंमतीवर २.५० टक्के सीजीएसटी आणि २.५० टक्के एसजीएसटी असा एकूण ३०.७४ रुपये अर्थात ५ टक्के जीएसटी लागतो. त्यानुसार ग्राहकाला ६४६ रुपये चुकते करावे लागतात. वितरक म्हणाले, काही दिवसांपूर्वी ग्राहकाला सिलिंडर मिळण्यास उशीर झाला होता. त्याचे कारण केवायसी होते. अनेक ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासह मोबाईलची जोडणी केली नव्हती. ज्यांनी केली त्यांनाच सिलिंडर देण्यात येत होते. ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाने जोडणी केल्यानंतर त्यांच्या घरी सिलिंडर सुरळीत जात आहे.
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक उपयोग
घरगुती गॅस सिलिंडरचा उपयोग फूटपाथवरील खाद्य विक्रेत्यांकडून जास्त होतो. पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे त्यांचे फावते. याच कारणामुळे बऱ्याचदा सिलिंडरचा तुटवडा होतो. विक्रेत्यांसाठी तिन्ही तेल कंपन्यांचे जास्त क्षमतेचे व्यावसायिक सिलिंडर आहेत. पण ते महाग पडत असल्याने बहुतांश विक्रेते घरगुती गॅस सिलिंडरचा उपयोग करतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधिक रक्कम घेऊन शहर व जिल्ह्यात सिलिंडरची अनधिकृतरीत्या विक्री होत असल्याचे प्रकारही सुरू असल्याची माहिती आहे.
घरपोच डिलिव्हरीसाठी १६ रुपये अतिरिक्त !
विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६४६ रुपये आहे. पण डिलिव्हरी बॉय ग्राहकाकडून थेट ६६० ते ६८० रुपयांपर्यंत मागणी करतात. अनेक वितरकाकडे पगारी नोकर आहेत तर काही ठिकाणी कमिशनवर सिलिंडर पोहोचविणारी माणसे आहेत. काही वितरक डिलिव्हरी बॉयला कमिशनऐवजी महिन्याला ४ ते ५ हजार रुपये वेतन देतात. त्यामुळे ग्राहकाकडून अतिरिक्त रकमेची ते मागणी करतात. त्यांचा नाहक भूर्दंड ग्राहकावर बसतो.
केवायसी जोडणी केलेल्या ग्राहकाच्या बँक खात्यात विनाअनुदानित सिलिंडरची सबसिडी जमा होत आहे. याशिवाय घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नसून सर्वांना नियमित सिलिंडर मिळत आहेत. ग्राहकांनी नंबर लावल्यानंतर तातडीने त्यांना घरपोच सिलिंडर मिळत आहे.
ए.के. सवई, अन्न वितरण अधिकारी.
गॅस सिलिंडरचा नंबर लावल्यानंतर दोन वा तीन दिवसात सिलिंडर घरी येत आहे. सणांमध्ये सिलिंडर मिळण्यास वेळ लागत होता. याशिवाय किंमत स्थिर असल्याने दोन महिन्यांपासून बँक खात्यात ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या पुरवठा सुरळीत आहे.
संजय इंगोले, ग्राहक़
जिल्ह्यातील सिलिंडरधारक १०,१२,६८३
गॅस वितरक ३८३
विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ६४६ रुपये
मिळणारी सबसिडी ४०.१० रुपये