पत्नी आजारी असल्यामुळे डॉन अरुण गवळीला पॅरोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 08:45 PM2022-06-22T20:45:54+5:302022-06-22T20:46:22+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कुख्यात डॉन अरुण गवळी याला पत्नी आजारी असल्यामुळे नियमानुसार अभिवचन रजा (पॅरोल) द्या, असे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कुख्यात डॉन अरुण गवळी याला पत्नी आजारी असल्यामुळे नियमानुसार अभिवचन रजा (पॅरोल) द्या, असे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
गवळीने रजा मिळविण्यासाठी सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याला रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी, गवळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले. करिता, यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असे त्याचे म्हणणे होते. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.