डॉन अरुण गवळीला हवी संचित रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:05+5:302021-07-08T04:07:05+5:30
नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने २८ दिवसांची संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ...
नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने २८ दिवसांची संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून या याचिकेवर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीला कुटुंबीयांना भेटण्यासाठी ही रजा हवी आहे. त्याने रजा मिळण्यासाठी सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कारागृह प्रशासनाचा निर्णय अवैध असल्याचे त्याचे म्हणणे आहे. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही असेदेखील त्याने याचिकेत नमूद केले आहे. त्याला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.