रक्तदान करताय? सोबत आधार कार्ड ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:48 AM2019-09-09T11:48:13+5:302019-09-09T11:49:57+5:30

राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करतेवेळेस रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या संदर्भात तूर्तासतरी सक्तीचे आदेश निघालेले नाहीत.

Donating blood? Keep Aadhar card along | रक्तदान करताय? सोबत आधार कार्ड ठेवा

रक्तदान करताय? सोबत आधार कार्ड ठेवा

Next
ठळक मुद्देसक्ती नाहीराज्य रक्तसंक्रमण परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठ्यातमोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असते. मात्र अनेकदा याच रक्तदानातून एचआयव्ही बाधाही होते. अलिकडे असे प्रकरण वाढले आहेत. हा धोका कमी करण्यासाठी व एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करतेवेळेस रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या संदर्भात तूर्तासतरी सक्तीचे आदेश निघालेले नाहीत.
राज्यात २५० रक्तपेढ्या आहेत. रक्तदानाच्या जनजागृतीमुळे रक्तदानाचा टक्काही वाढत चालला आहे. मात्र बहुसंख्य पेढ्यांकडून रक्तदानापूर्वी रक्तदात्यांचे समुपदेशन होत नाही. यामुळे रक्तदात्याचे असुरक्षित लैंगिक संबध होते का, संसर्गित इंजेक्शन वा सलाईनचा वापर झाला होता का, शरीरावर टॅटू गोंदला आहे का, यासारखे महत्त्वाचे प्रश्न विचारले जात नाही. अनेकदा या प्रश्नांना फाटा देऊन तुम्हाल रक्तदाब आहे का, मधुमेह आहे का, श्वान चावले होते का, कुठल्या औषधी सुरू आहेत, आदी प्रश्न विचारल्या जातात. शिवाय, रक्तदात्यांकडून रक्तदानापूर्वी भरून घेतलेल्या अर्जावर अनेक रक्तदाते अर्धवट पत्ता लिहितात. काही रक्तपेढ्या दर तीन महिन्यांनी रक्तदात्याकडून रक्तदान होण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर वारंवार मॅसेज करतात, तर काही फोन करतात.
परिणामी अनेक रक्तदाते अर्जावर चुकीचा मोबाईल नंबर देतात. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर रक्तामध्ये संसर्ग आढळला, तर त्याच्याशी संपर्क करणे रक्तपेढ्यांना शक्य होत नाही. संसर्ग झाल्याची थेट माहिती देण्याऐवजी त्यांना भेटून त्यांचे समुपदेशन करणेही महत्त्वाचे असते. परंतु अर्धवट पत्त्यांमुळे त्यांच्यापर्यंत पोहचताच येत नाही. परिणामी, रक्तपेढ्यांकडून अशा बाधितांची माहिती ‘इंटिग्रेटेड काऊन्सलिंग अँड टेस्टिंग सेंटर’कडे (आयसीटीसी) सेंटरकडे पाठवली जात नाही.
यावर उपाय म्हणून राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदात्यांकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात रक्तपेढ्या संचालकांना या संदर्भातील सूचना आल्या आहेत. परंतु हे प्रस्तावित असल्याचेही नमूद केले आहे. यामुळे तूर्तास तरी रक्तदात्यांना आधारकार्डची सक्ती नाही.

‘नॅट’ची सक्ती असावी !
रुग्णाला रक्त देताना ‘एचआयव्ही-१’, ‘एचआयव्ही-२’, ‘हिपॅटायटिस -बी’, ‘हिपॅटायटिस-सी’, गुप्तरोग आणि मलेरिया या चार प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यातून रक्तात रोगजंतू नसल्याची खात्री करून घेतली जाते. आजही या चाचण्या जिथे ‘न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी’(नॅट) नाही तिथे ‘एलायजा’पद्धतीने केल्या जातात. ‘एलायजा’ पद्धतीने एचआयव्ही चाचणीचा रिपोर्ट यायला ‘विंडो पिरियड’ कालावधी तीस दिवसांचा लागतो. परंतु ‘नॅट’ तंत्रज्ञानाने केवळ सहा ते आठ दिवसांमध्ये या चाचणीचा अहवाल मिळतोे. ‘नॅट टेस्ट’ तंत्रज्ञान ‘विंडो पिरियड’ कमी करत असल्याने विषाणूच्या बाधेची शक्यता अनेक पटींनी कमी होते. रक्त संक्रमणादरम्यान सुरक्षित रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन रुग्णांनी ‘नॅट टेस्टेड’ रक्ताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र एकाही शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. मोजक्याच रक्तपेढ्यांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यामुळे आधार कार्डसोबतच‘नॅट’ची सक्ती असणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे.

आधार कार्ड प्रस्तावित आहे
राज्य रक्तसंक्रमण परिषदेने रक्तदान करताना रक्तदात्यांकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेतला असलातरी अद्यापही तो प्रस्तावित आहे. आधाराची सक्ती केलेली नाही. मात्र याचा फायदा संबंधित रक्तदात्यालाच होणारा आहे. रक्तात एचआयव्ही आढळल्यास त्याला उपचाराखाली आणता येईल, इतरांना संसर्गाचा धोका कमी होईल.
-डॉ. हरीश वरभे,
उपाध्यक्ष, इंडियन सोसायटी आॅफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अ‍ॅण्ड इम्युनोहेमेटोलॉजी

रक्तदात्याच्या संपर्कासाठी ‘आधार’
काही रक्तपेढ्या रक्तदान शिबिर घेताना रक्तदात्याचा पत्ता, मोबाईल नंबर या शिवाय इतरही माहिती गांभीर्याने नमूद करून घेत नाही. अनेकदा रक्तदात्यांचे पत्ते, संपर्क क्रमांक चुकीचे असतात. आधार कार्डमुळे रक्तदात्याची संपूर्ण माहिती मिळते. दरम्यान, तपासणीत एचआयव्ही आढळल्यास ‘आयसीटीसी सेंटर’ व संबंधित दात्याशी संपर्क साधून त्याला उपचाराच्या प्रक्रियेत आणता येते.

Web Title: Donating blood? Keep Aadhar card along

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.