दरोडेखोर सुबोधसिंगच्या पत्नीला अटक
By admin | Published: November 4, 2016 02:35 AM2016-11-04T02:35:52+5:302016-11-04T02:35:52+5:30
दरोडेखोर पतीची माहिती लपवून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंगची पत्नी जान्हवी हिला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे.
पतीच्या होती संपर्कात : बिहारमधून आणले नागपुरात
नागपूर : दरोडेखोर पतीची माहिती लपवून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंगची पत्नी जान्हवी हिला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. तिला गुरुवारी कोर्टात हजर करून ८ नोव्हेंबरपर्यंत तिचा पीसीआर मिळविण्यात आला.
कुख्यात सुबोधसिंग आणि त्याच्या टोळीतील सशस्त्र दरोडेखोरांनी मणप्पुरम गोल्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयावर २८ सप्टेंबरला भरदिवसा दरोडा घालून ३१ किलो सोेने आणि ३ लाखांची रोकड लुटून नेली. नागपूरच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा घालणाऱ्या सुबोधसिंगचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांसह राज्याची तपास यंत्रणाही कसोशीने प्रयत्न करीत आहे.
यासाठी सुबोधसिंगच्या मूळ गावी म्हणजेच बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील चिस्तीपूर-चंडी आणि आजूबाजूच्या भागात पोलीस पथके रात्रंदिवस तपास करीत आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, केरळची तपास यंत्रणाही कामी लागली आहे. मात्र, कुख्यात सुबोधसिंग आणि त्याच्या साथीदारांचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांनी सुबोधसिंगच्या मोठ्या भावाला रायपुरातून नागपुरात आणून चौकशी केली. त्याच्याकडून माहिती न मिळाल्यामुळे सुबोधसिंगच्या पत्नीलाही नागपुरात आण्ण्यात आले होते. मात्र, या दोघांनीही सुबोधसिंगबद्दल फारशी समाधानकारक माहिती पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले होते.
दरम्यान, या दोघांच्याही हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली होती. त्यासाठी गुन्हे शाखेची आणि जरीपटका पोलिसांची वेगवेगळी पथके सुबोधसिंगची पत्नी त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याच्या निरंतर संपर्कात असल्याचे आणि ती तसेच त्याचे अन्य नातेवाईक पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे जरीपटका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सकाळी तिला ताब्यात घेतले. दुपारी कोर्टातून रीतसर प्रक्रिया आटोपल्यानंतर बुधवारी रात्री हे पथक जान्हवीला घेऊन नागपुरात पोहोचले. त्यानंतर अटक दाखविण्यात आली. गुरुवारी तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोर्टात हजर करून तिचा ८ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. ठाणेदार चक्षुपाल बहादूरे, पीएसआय ठाकूर आणि त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
नेपाळ सीमेवर शोधाशोध
लुटलेले सोने आणि रक्कम घेऊन सुबोधसिंग साथीदारांसह बिहारलगतच्या नेपाळ सीमावर्ती भागात दडून असावा, असा पोलिसांना संशय आहे. ते सर्व नेपाळमध्ये पळून जाण्याचीही शक्यता आहे. परिणामी पोलीस नेपाळच्या सीमेवरही सुबोधसिंग आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.