रावणाच्या दहाव्या डाेक्यावरचे गाढव; ‘बुद्धी भ्रष्ट झाली की पतन निश्चित’चे सूचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 08:10 AM2022-10-02T08:10:00+5:302022-10-02T08:10:05+5:30
Nagpur News ‘बुद्धी भ्रष्ट झाली की तुमचे पतन निश्चित’ हेच या गाढव रूपातून सुचवायचे असते. दशासनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गाेष्टीचे सूचक रूप देऊन सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तूरचंद पार्कवर यंदा रावणदहन हाेणार आहे.
अंकिता देशकर
नागपूर : रावणाला दहा डाेके हाेते, म्हणून त्याला दशासनही म्हटले जाते. चार डावीकडे, चार उजवीकडे आणि एक मधातील मुख्य डाेके. दहावे डाेके मुख्य डाेक्याच्या थाेडे वर असते, जे गाढवाच्या रूपात असते. ‘बुद्धी भ्रष्ट झाली की तुमचे पतन निश्चित’ हेच या गाढव रूपातून सुचवायचे असते. दशासनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गाेष्टीचे सूचक रूप देऊन सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तूरचंद पार्कवर यंदा रावणदहन हाेणार आहे.
सनातन धर्म युवक सभेतर्फे रावणदहनाचे हे ७१ वे वर्ष आहे. सभेचे प्रशांत साहनी यांनी सांगितले, गाढव हे मूर्खपणाचे लक्षण आहे. त्यामुळे दरवर्षी रावणाच्या पुतळ्याला हे दहावे गाढवाचे डाेके लावले जाते. हे त्याच्या मूर्खपणामुळे झालेल्या पतनाचे प्रतीक आहे. गाढवाच्या डाेक्यासह असलेला रावणाचा पुतळा केवळ कस्तूरचंद पार्कवरच तयार करून सादर केला जाताे. रावणदहन उत्सवाच्या सुरुवातीपासूनच ही परंपरा कायम आहे. समाजातील ज्येष्ठांना असे वाटले की, पुतळ्यांमधूनही काहीतरी संदेश असावा. त्याप्रमाणे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद या तीन पुतळ्यांना तीन थीम जोडल्या आहेत.
मारबत उत्सवामध्ये दुष्ट प्रवृत्ती निघून जाण्याचा संदेश दिला जाताे. त्याप्रमाणे दरवर्षी रावणदहनात तीन पुतळ्यांतून तीन संकल्पना जाेडल्या जात आहेत. वर्षभरात झालेली एखादी दुष्ट प्रवृत्ती एका पुतळ्यातून सादर केली जाते आणि त्या दुष्टतेसाेबतच जाळली जाते. या संकल्पना पुतळ्याच्या नाभीजवळ व्यंगचित्राच्या स्वरूपात कोरलेल्या आहेत. यावर्षीच्या थीम अद्याप ठरलेल्या नाहीत आणि लवकरच त्या केल्या जातील, असे साहनी यांनी स्पष्ट केले. या सर्व गोष्टी कस्तूरचंद पार्क येथील रावणदहन विशेष बनवतात.