ज्येष्ठांना त्रास नको; रेड झोनवर लक्ष केंद्रित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:19 PM2021-04-28T23:19:31+5:302021-04-28T23:20:42+5:30
Vaccineकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ शकतो. शहरात उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या लक्षात घेऊन १ मेपासूनचे लसीकरणाचे नियोजन करा. या काळात ज्येष्ठांना लसीकरणात बाधा होणार नाही याचीही काळजी घ्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरणाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने महापौरांनी बुधवारी ऑनलाइन आढावा बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ शकतो. शहरात उपलब्ध होणाऱ्या लसींची संख्या लक्षात घेऊन १ मेपासूनचे लसीकरणाचे नियोजन करा. या काळात ज्येष्ठांना लसीकरणात बाधा होणार नाही याचीही काळजी घ्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरणाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने महापौरांनी बुधवारी ऑनलाइन आढावा बैठक घेतली.
शहरातील जे रेड झोन आहेत त्या झोनमध्ये समूह चाचणीचे नियोजन करा, १० झोनच्या १० मोबाइल चाचणी व्हॅन आहेत. त्यासंदर्भातील नियोजन करून एकाच दिवशी दहाही व्हॅन एकाच झोनमध्ये पाठवून चाचणी करण्यात यावी. लसीकरणासाठीही रेड झोनला टारगेट करता येईल का, त्यादृष्टीने विचार आणि नियोजन करा, कमी प्रतिसाद असलेले लसीकरण केंद्र इतरत्र हलविण्यात यावे, असेही निर्देश महापौरांनी दिले.
आमदार गिरीश व्यास, प्रवीण दटके, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., माजी महापौर संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके आदी सहभागी झाले होते.
अशा आहेत सूचना
एकाच ठिकाणी लसीकरण व कोविड चाचणी केंद्र नसावे.
सर्व केंद्रांना समान लस पुरवठा करावा.
केंद्रावर उपलब्ध लस साठ्याची माहिती नगरसेवकांना द्यावी.
एका प्रभागात दोन लसीकरण केंद्र सुरू करा.
फिरते लसीकरण सुरू करावे, व्हॅनची व्यवस्था करावी.
लस कोणाला घेता येणार नाही. याची केंद्रावर माहिती असावी.
बारा लाख लोकांना लस दिली जाणार
नागपूर शहरातील १८ वर्षांवरील १२ लाख लोकांना लस दिली जाणार आहे. यासाठी आवश्यक पुरवठा करावा लागेल. यासाठी नियोजन सुरू आहे. कोविड रुग्णांसाठी पाचपावली व अन्य काही ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली जात असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.