वाढदिवस साजरा करू नका, भेटूही नका : नितीन गडकरी यांचे भावनिक आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:00 PM2020-05-25T20:00:32+5:302020-05-25T20:36:58+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत. देशातदेखील गंभीर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ मे रोजी कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये तसेच शुभेच्छा देण्यासाठी भेटूही नये, असे भावनिक आवाहन गडकरी यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत. देशातदेखील गंभीर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ मे रोजी कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये तसेच शुभेच्छा देण्यासाठी भेटूही नये, असे भावनिक आवाहन गडकरी यांनी केले आहे.
हे भावनिक आवाहन करताना माझ्याही मनाला त्रास होत आहे. परंतु सर्वांची काळजी असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. आपण मला समजून घ्याल, अशी विनंतीही गडकरींनी कार्र्यकर्त्यांना केली आहे.
यंदा गडकरी यांनी सामाजिक भान राखत वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत. गरजूंना आधार देण्यासाठी कार्यकर्ते लागले आहेत. अशावेळी मी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे माझे सर्व मित्र, कार्यकर्ते, नागरिक यांनी भेटायला व शुभेच्छा द्यायला येऊ नये. असे केले तर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होईल. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळून गरजूंना सहकार्य करावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.
सर्वांनी घरात राहून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लॉकडाऊन संपल्यावर मी सर्वांशी वैयक्तिक भेट घेईन, असेही गडकरी यांनी सांगितले आहे.