व्यवसायाला ऑड-इव्हन आणि वेळेचे बंधन नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:44 PM2020-07-07T21:44:25+5:302020-07-07T21:47:13+5:30
ऑड-इव्हन आणि वेळेचे बंधन दुकानदारांवर का, असा सवाल करीत ही बंधने दूर करून शासनाने सकारात्मक वातावरणात व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाच्या कोविड-१९ नियमांचे पालन सर्वच दुकानदार करीत आहेत. मास्क, सॅनिटायझेशन, ग्लोव्हज याचाही उपयोग दुकानात करण्यात येत आहे. सध्या दुकानात मोजकेच ग्राहक येत असून, व्यापाऱ्यांनी त्यांच्यासाठी सुरक्षेच्या सर्वच उपाययोजना केल्या आहेत. दुकानदार सर्वच नियमांचे पालन करीत असताना ऑड-इव्हन आणि वेळेचे बंधन दुकानदारांवर का, असा सवाल करीत ही बंधने दूर करून शासनाने सकारात्मक वातावरणात व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.
कोरोना लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची वगळता सर्वच बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे तब्बल अडीच महिने दुकाने बंद राहिली. ४ जूनपासून दुकाने पुन्हा सुरू झाली. पण ऑड-इव्हन पद्धत आणि सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत वेळेचे बंधन असल्याने ग्राहक आवश्यक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. एखाद्या व्यापाऱ्याचा स्थायी ग्राहक दुसऱ्या दुकानातून खरेदी करीत असल्याने संबंधित व्यापाऱ्याला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.ऑड-इव्हन पद्धत हटविल्यास ग्राहक मुक्तहस्ते खरेदी करतील. त्याचा फायदा दुकानदारांना निश्चितच होईल, असे व्यापाºयांनी सांगितले.
ऑड-इव्हन पद्धतच चुकीची
ऑड-इव्हन पद्धतीने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दुकाने दररोज आणि वेळेत सुरू करून शासनाने व्यापाऱ्यांचाही विचार करावा. दुकानदार स्वत:, कर्मचारी आणि ग्राहकांची सुरक्षा करण्यास सक्षम आहे. सर्व उपाययोजना तो करीतच आहे. त्यामुळे शासनाने काही नियम शिथिल करावेत. आता व्यापाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे.
अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.
जिल्ह्याच्या सीमा खुल्या कराव्यात
जिल्ह्याच्या सीमा खुल्या नसल्याने व्यापाऱ्यांना अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून वसुली करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना नवीन माल खरेदीसाठी समस्या आल्या आहेत, शिवाय बँकांच्या व्याजदराचा फटका बसत आहे. लग्नसराईची खरेदी कमी झाल्याने मोजकेच ग्राहक बाजारात येत आहेत. दुकान कोणत्याही दिवशी सुरू राहील, त्याचे मॅसेज पाठवावे लागत आहेत.
अजय मदान, अध्यक्ष, गांधीबाग होलसेल क्लॉथ असोसिएशन.
व्यापारी सुरक्षा करण्यास सक्षम
व्यापारी कोविड-१९ च्या नियमांचे तंतोतंत पालन करीत असून, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यास तो सक्षम झाला आहे. तो जर नियमांचे पालन करीत असेल तर शासनाने ऑड-इव्हन आणि वेळेची अट काढून टाकावी. या अटीमुळे व्यापारी ग्राहकांपासून दुरावल्याने त्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
विष्णू पचेरीवाला, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स.