संस्कार, मूल्य, निसर्गाचे पतन करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:35+5:302021-04-26T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भगवान महावीर यांनी त्यांच्या जीवनचरित्रातून संस्कार, मानवी मूल्ये आणि निसर्गासोबत प्रेम करण्याचा संदेश दिला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान महावीर यांनी त्यांच्या जीवनचरित्रातून संस्कार, मानवी मूल्ये आणि निसर्गासोबत प्रेम करण्याचा संदेश दिला. ‘जगा आणि जगू द्या’ हा त्यांचा प्रमुख संदेश असून, त्याच्या आधारावरच जगात सुख-शांती प्रस्थापित होऊ शकते. लहान मुलांना संस्कारित करण्याची आवश्यकता आहे. मूल्यांचा अभाव असेल तर आयुष्याचे अधःपतन होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला हानी पोहोचविणे आपल्याला पतनाकडे ढकलत आहे. कोरोना महामारी त्याचाच परिणाम आहे, असे मत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणकाच्या निमित्ताने रविवारी महावीर इंटरनॅशनलच्या नाशिक शाखेतर्फे ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य वक्ता म्हणून विजय दर्डा बोलत होते. ‘महावीरांचे सिद्धान्त आणि विज्ञानाचे महत्त्व’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नवीन पिढी सुसंस्कारित व्हावी या दृष्टीने साधू-संतांनी महावीरांचे विचार व सिद्धान्त जनमानसापर्यंत पोहोचवायला हवेत. जेव्हा एखाद्याच्या कार्यक्षेत्रात, त्याच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तणाव निर्माण होतो व त्यातून आपल्याला मोठे नुकसान होते. निसर्गाला नुकसान पोहोचविण्याचा फटका आपल्याला कोरोना महामारीच्या रूपात बसला आहे. सर्व साधू-संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे भगवान महावीर यांच्या सिद्धान्तांचे पालन केले तर सकल जैन समाज मजबूत होईल. आपण प्रेम, दया, करुणेचे भाव प्रत्येकाच्या हृदयात जागृत करू शकतो, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा. भगवतीस्वरूप आहेत, असे म्हणत १९९४ साली नागपुरात झालेल्या त्यांच्या चातुर्मासाच्या आठवणींवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा., क्रांतिकारी मधुस्मिता म. सा., मंगलप्रभाजी म. सा., इत्यादी साध्वी उपस्थित होत्या. मंगलाचरण व भगवान महावीर यांच्या वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगलपाठाने समारोप झाला. महिलाप्रमुख डॉ. संगीता बाफना यांनी संचालन केले. महावीर इंटरनॅशनल नाशिक शाखेचे अध्यक्ष अनिल नाहर, सचिव राजेंद्र बाफना यांनीदेखील कार्यक्रमाचे संचालन केले. ललित सुराणा यांनी तांत्रिक सहकार्य केले.
भगवानांचे सिद्धान्त आत्मसात करा : छाजेड
आज सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. आपण अज्ञात शत्रूसोबत लढतो आहोत. दोन हजार वर्षांअगोदर भगवान महावीर यांनी आपल्याला जे तत्त्वज्ञान दिले, त्या माध्यमातून आपण हा लढा जिंकू शकतो. विचार व आचार कसे असावेत, याचा संदेश त्यांनी दिला. आपण त्याचे अनुसरण करू शकतो. ‘जगा आणि जगू द्या,’ या संदेशाला आत्मसात करून भगवानांना वंदन करावे, असे प्रतिपादन नाशिकचे माजी आमदार व कार्यक्रमाचे उद्घाटक जयप्रकाश छाजेड यांनी केले.
सेवा आणि समर्पणाचा आदर्श प्रस्थापित करा : मुथा
आज आपण पाश्चात्त्य संस्कृतीकडे जात आहोत. धर्म आणि समाजासाठी आपल्याला भगवान महावीर यांच्या जीवनापासून शिकवण घ्यायला हवी. भगवान महावीर यांच्या संदेशानुसार आपण सर्वांच्या सेवेत लागले पाहिजे. यातूनच भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्याचे सार्थक होईल. कोरोनाकाळात शक्य होईल तितकी मदत लोकांपर्यंत पोहोचवा. जैन समाजाने त्याग, सेवा व समर्पणाच्या माध्यमातून देश व जगासमोर आदर्श प्रस्थापित करावा, असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, समाजसेवक व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शांतिलाल मुथा यांनी व्यक्त केले.